शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांनी विश्वकोशाचे वाचन करावे आणि विश्वकोशाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी इतरांनाही प्रवृत्त करावे, असे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी सोमवारी येथे केले.
चेंबूर येथील आचार्य-मराठे महाविद्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात डॉ. जाधव यांच्या हस्ते मराठी विश्वकोशाचे सर्वच्या सर्व म्हणजे १६ खंड विश्वकोशाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले.  हे सर्व खंड आता पाहता आणि वाचता येणार आहेत.
‘सी-डॅक’च्या सहकार्याने हे कोश संकेतस्थळावर टाकले गेले आहेत. या प्रसंगी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, ‘सी-डॅक’चे सहसंचालक महेश कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य मुळे आदी उपस्थित होते. विश्वकोश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १ ते १५ आणि प्रा. मे. पु. रेगे यांनी १६ व्या खंडाचे संपादन केले आहे.  
प्रयत्नवाद, आशावाद, उच्च ध्येय, विनम्रता, आत्मविश्वास, अपयशावर मात करण्याची वृत्ती, प्रागतिक दृष्टिकोन, वेळेचा नियोजनबद्ध वापर आणि राष्ट्रप्रेम या नऊ महत्त्वाच्या गोष्टी तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाणवाव्या, असे आवाहनही डॉ. जाधव यांनी  केले.
डॉ. वाड म्हणाल्या की, विश्वकोश हा कोशात न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, हा आमचा प्रयत्न आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी रसिका जाधव हिने विश्वकोशाच्या १४ व्या खंडातील कवी यशवंत यांच्यावरील नोंदीचे वाचन या वेळी केले. डॉ. चारुशीला ओक, डॉ. अ. ना. ठाकूर, डॉ. मगर, अविनाश तांबे, डॉ. प्रधान, डॉ. म्हापणकर आदी मान्यवरही या कार्यक्रमास उपस्थित होते.
विश्वकोश लवकरच टॅबलेटवर
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले विश्वकोशाचे सर्व खंड आता टॅबलेटवरही कसे पाहता येतील, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ‘सी-ॅक’चे महेश कुलकर्णी यांनी या वेळी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा