दलित विद्यार्थी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सोयी सुविधाही नाहीत आणि त्यांना मारहाण होते, अशा स्वरूपाच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यावरून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी मिलिंद शेगावकर आणि उपजिल्हाधिकारी प्रवीण ठाकरे यांनी येथील बाजोरिया नगरात असलेल्या दलित वसतिगृहास भेट देऊन तपासणी केली तेव्हा वसतिगृहातील भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आक्रोश करीत साहेब आम्हाला न्याय द्या, अशी विनवणी केली. वसतिगृहाची आम्हालाच झाडझुड करावी लागते आणि ती केली नाही तर मारहाण होते, अशा गंभीर तक्रारी या विद्यार्थ्यांनी पूर्वीच जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना प्रत्यक्ष भेटून केल्या होत्या. ही बाबही तपासणी अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली. बाजोरीया नगरातील पाखरे यांच्या घरी असलेल्या या दलित वसतिगृहात विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध विद्यार्थ्यांनीच आवाज उठवून आम्हाला दुसरे वसतिगृह द्या, अशी मागणी केली. वसतिगृहात असलेल्या तीन ते सात वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याची ही पहिलीच घटना असावी, असे सांगण्यात आले. तपासणी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन वसतिगृह चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.    

Story img Loader