पिस्तुलाच्या गोळ्या कुठून आणता, चोरांना मार देता का, आदी विविध प्रश्नांच्या फैरींना पोलिसांना तोंड द्यावे लागले. या प्रश्नांवर न रागावता पोलिसांनी उत्तरे दिली. एरवी गुन्हेगारांसोबत सामना करावा लागणाऱ्या पोलिसांवर ही वेळ आली ‘पोलीस रायझिंग डे’च्या निमित्ताने.
प्रतापनगर पोलीस ठाण्याला खामल्यातील सिंधी हिंदी हायस्कूलच्या दोनशेहून अधिक शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवधेशप्रसाद त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयी तसेच गुन्हे घडू नयेत आणि घडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कर्तव्याविषयी माहिती सोप्या शब्दात समजावून सांगितली. रायफल, पिस्तूल, हातकडी, गोळी विद्यार्थ्यांनी विशेष कुतुहलाने पाहिल्या. चोराला कसे पकडता? कलम म्हणजे काय? पिस्तुलाच्या गोळ्या कुठून आणता, चोरांना मार देता का, आदी प्रश्नांना त्रिपाठी व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत पोलिसांची कार्यपद्धती समजावून सांगितली. शहरातील बहुतांशी पोलीस अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांच्या फैरींना पोलिसांना तोंड द्यावे लागले.
नागपूरसह राज्यभरात ‘पोलीस रायझिंग डे’ साजरा झाला. यानिमित्ताने ‘पोलिसांना जाणून घ्या’ हा उपक्रम राबविला गेला.
पोलीस व जनता संबंध अधिक घट्ट करण्याच्या प्रमुख उद्देश यामागे आहे. नागपुरात रोज सायंकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान फुटाळा तलाव, अंबाझरी उद्यान, महाराजबाग, धंतोली उद्यान, गांधीबाग उद्यान, कस्तुरचंद पार्क, जपानी गार्डन, दत्तात्रेय नगर, लता मंगेशकर उद्यान येथे पोलीस बँड वादन झाले.
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना शस्त्रांची तसेच पोलिसांच्या कामाची माहिती दिली गेली.
शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी जाऊन पोलिसांनी वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. चर्चासत्र वा परिसंवाद आयोजित करण्यात आले.
महिला, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, महिला सामाजिक कार्यकर्त्यां तसेच समाजातील विविधवर्गातील घटकांना त्यात सहभागी करून घेण्यात आले. महिला सामाजिक सुरक्षा तसेच ज्येष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली. पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांनी स्वत: ज्येष्ठांशी संवाद साधला.
गुन्हे शाखेतर्फे जनजागरण मिरवणूक काढण्यात आली.
राष्ट्रीय सुरक्षा योजनेचे विविध महाविद्यालयातील एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी, पोलीस अधिकारी त्यात सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, सहपोलीस आयुक्त अनुपकुमारसिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, गुन्हे शाखेच्या प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपाली मासिरकर, पोलीस उपायुक्त इशू सिंधू, निर्मला देवी, अभिनाशकुमार, संजय लाटकर, श्रीप्रकाश वाघमारे, विजय पवार, भारत तांगडे यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त, निरीेक्षकांसह संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांनी या सर्व उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर प्रश्नांच्या फैरी
पिस्तुलाच्या गोळ्या कुठून आणता, चोरांना मार देता का, आदी विविध प्रश्नांच्या फैरींना पोलिसांना तोंड द्यावे लागले.
First published on: 09-01-2015 at 03:47 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students ask many questions to police officers