गेल्या ५८ दिवसांपासून विद्यापीठ परीक्षांवर बहिष्कार केलेल्या प्राध्यापकांच्या आंदोलनाविरोधात आता विद्यार्थ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून विरोधी प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यांनी आपापल्या पातळ्यांवर आंदोलनाच्या विरोधात नापसंती व्यक्त केली आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून प्राध्यापकांच्या संपाला विरोध होत असताना विद्यार्थ्यांनीही तोंड उघडायला सुरुवात केली आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी सरळसरळ प्राध्यापकांच्या विरोधात बोलायला कचरतात किंवा टाळतात. मात्र फेसबुकच्या माध्यमातून आणि एनएसएसद्वारे इतर विद्यापीठात जाण्याची संधी मिळणारे विद्यार्थीही प्राध्यापकांना आंदोलन मागे घेण्यास विनंती करतात. मात्र फेसबुकवर जाणारे विद्यार्थी हे असंघटित विद्यार्थी असून त्यांचा कोणत्याही विद्यार्थी संघटनेशी संबंध नाही. विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या आंदोलनाला हे विद्यार्थी विरोध करू इच्छित नव्हते. मात्र, आता फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी प्राध्यापकांच्या आंदोलनावर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे.
प्राध्यापकांचे एकही आंदोलन १५ दिवसांच्या आत झालेले नसून लागोपाठ तिसऱ्यांदा होणारे हे आंदोलन आहे. यामध्ये दोन महिन्याचा कालावधी लोटूनही आंदोलनाची कोणतीच दखल शासन घेत नसून परीक्षा पुढे ढकलण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हिरेमोड झाला आहे. काही अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकण्याची भीती वाटते, काही विद्यार्थ्यांच्या मित्र-मैत्रिणीच्या किंवा नातलगांच्या लग्नाला हजर राहू न शकल्याची खंत वाटते तर काहींनी उन्हाळ्यातील विविध काही दिवसांच्या उपक्रमांसाठी परगावी जाण्यासाठी जय्यत तयारी केली असताना त्यांच्या आनंदावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विरजण पडले. यासर्व प्रकारांचा मनस्ताप झालेले विद्यार्थी आता फेसबुकच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या आंदोलनाच्या विरोधात प्रचार करीत आहेत. काहींनी तर गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन साजरा न करण्याचा संकल्प केला आहे. काही विद्यार्थी रात्री-बेरात्री प्राध्यापकांना फोन करून त्यांना संप मागे घेण्यासाठी विनवणी करणार आहेत.
प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे गेल्यावर्षी मुलींना पुढील शिक्षण घेण्यास केवळ अडचण गेली नाही तर त्यांना किंमत मोजावी लागली. मुलींसाठी लग्न हीच मोठी परीक्षा असल्याने एकवेळ तिने परीक्षा नाही दिली तरी चालेल, ती अनुत्तीर्ण झाली तरी चालेल किंवा तिला कमी गुण मिळाले तरी चालतील. पण, लग्नाची तारीख पुढे ढकलायची नाही, अशीच तिच्या पालकांची आणि होणाऱ्या वराच्या घरच्यांची मानसिकता असते. गेल्यावर्षी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा शेवटचा पेपर तिच्या लग्नाच्या दिवशी आला. प्राध्यापकांच्या संपाचा अंदाज तिला आल्याने तिने पालकांना लग्न थोडे पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र पालकांनी तिचे काहीच ऐकले नाही. आधीचे वर्ष मेरीटमध्ये असलेली विद्यार्थिनी कशीबशी उत्तीर्ण झाली. अशा अनेक विद्यार्थिनी असू शकतात. एकूणच विद्यार्थीही प्राध्यापकांच्या संपाला विटले आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण प्राध्यापकच आहेत, हे त्यांना उमगू लागले आहे.

Story img Loader