लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. गेल्या १० वर्षांत प्रथमच विद्यार्थ्यांचा स्वयंस्फूर्त मोर्चा पाहावयास मिळाल्याची चर्चा शहरात होत होती.
विद्यार्थी संघर्ष समितीच्या बॅनरखाली विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हा मोर्चा काढला. शाहू महाविद्यालयापासून गांधी चौक, टाऊन हॉल, अशोक हॉटेल मार्गे निघालेल्या मोर्चात मोठा उत्साह दिसत होता. दयानंद महाविद्यालयासह परिसरातील विद्यार्थी आपापल्या महाविद्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र जमले.
महाविद्यालयातील विद्यापीठ प्रतिनिधी, वर्ग प्रतिनिधी, विद्यार्थी सचिव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. राजकीय पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचा मोर्चाला पाठिंबा असला, तरी कोणाचेही बॅनर मोर्चात नव्हते.

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क माफ करून ते परत द्यावे, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम महागाई निर्देशांकानुसार वाढवावी, शहरातील विविध संस्थाचालक दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी वर्गाचे शुल्क सक्तीने वसूल करीत आहेत. संबंधित संस्थेने उन्हाळी वर्गाची सक्तीने होत असलेली वसुली थांबवावी, सरकारने त्यांना तसे आदेश द्यावेत, सुशिक्षित बेरोजगारांना बेकारभत्ता द्यावा, क्रीडा क्षेत्राप्रमाणे कलाक्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस आरक्षण लागू करावे, विविध महाविद्यालयांत छेडछाड प्रतिबंधक पथक पोलिसांनी तैनात करावे, जातपडताळणी कार्यालयातून जातवैधता प्रमाणपत्र त्वरित देण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.

Story img Loader