विद्यार्थ्यांमध्ये संगणकाविषयी आवड निर्माण व्हावी, कौशल्य विकसित व्हावे, शोधक वृत्तीला वाव मिळावा, संगणकातील प्रत्येक तंत्राचे ज्ञान व्हावे या उद्देशाने गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील १८ शाळांमध्ये संगणक जत्रेचे आयोजन केले जात आहे. या जत्रेत संगणकाशी निगडित प्रत्येक वस्तू, घटकाचा विद्यार्थी बारकाईने अभ्यास करतात आणि ते चित्र, रांगोळी, प्रात्यक्षिक रूपाने सादर करतात.
ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरांतील माध्यमिक, प्राथमिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना या उपक्रमात संस्थेने सहभागी करून घेतले आहे. जनरल एज्युकेशन संस्था, शारदाश्रम, बालकमंदिर या संस्थांचे या उपक्रमाला चांगले सहकार्य मिळाले. संगणक जत्रेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी संगणक साक्षर होईल हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी ‘संगणक माझा मित्र’ विषयावर नाटिका सादर करतात. संगणक माणसाची कोणती कामे करू शकतो याविषयीचे सादरीकरण करतात. संगणकात काय असते ते पाहून विद्यार्थ्यांनी चिकणमातीच्या साहाय्याने मातीचा संगणक तयार करून त्याचा प्रत्येक सुटा भाग बनवून त्याचे प्रदर्शन घडून आणले. संगणकातील विविध लोगोंचा वापर करून त्यांच्या रांगोळ्या काढल्या. युनिकोड म्हणजे काय, त्याची माहिती, मोबाइल आणि संगणकातील फोटो, माहितीचे वहन यांविषयीच्या माहितीचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी करून दाखवले. ई-कचऱ्याच्या माध्यमातून घनकचऱ्याची समस्या कशी सोडवता येईल, ई-कचरा म्हणजे काय, हा प्रकल्पही तयार करण्यात आला होता. आताच्या कार्पोरेट युगात प्रत्येक गोष्टीला संगणक कसा पर्याय म्हणून उभा राहिला आहे, हेही विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून स्पष्ट केले.
घरातील प्रत्येक घटकाने संगणक हाताळणी केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी घरबसल्या पालकांसह आजी-आजोबांनाही संगणकाचे धडे गिरवण्याचे काम करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. हेच उपक्रम खेडेगावातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहेत, असे संयोजक दिवाकर ठोंबरे यांनी सांगितले.

Story img Loader