बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा ही भाविकांसाठी पर्वणी असली तरी हा मेळा यशस्वी करण्याचे एक आव्हान प्रशासनासमोर असून त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य या दोन आघाडय़ांवर नागरिक मोलाची भूमिका बजावू शकतात, असा आशावाद पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी व्यक्त केला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आणि डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाने सेवकांना त्यादृष्टिने प्रशिक्षित करणे सुरू करून एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असून येथील विद्यार्थी आणि कर्मचारी कुंभमेळ्यात उत्तम कामगिरी बजावतील, असा विश्वासही सरंगल यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ्यानिमित्त येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित संजीवनी मूलभूत जीवनाधार प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेत सरंगल यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, शिक्षणाधिकारी प्रा. रामनाथ चौधरी, प्राचार्य डॉ. महेश मिश्रा, प्राचार्या रिबेका सुसान्का, प्रा. नितीन हिरे उपस्थित होते.
प्रास्तविकात डॉ. पाटील यांनी रुग्णालयात उपलब्ध सुविधांचा आढावा घेऊन कुंभमेळ्याच्या दृष्टिने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. हे प्रशिक्षण पुढील टप्प्यात पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक आदींना देण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक वैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी अलमले यांनी आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच प्रतिबंधक उपायांबाबत जनजागृतीचे महत्व मांडले.
मान्यवरांनी कार्यशाळेत आयोजित प्रात्यक्षिकांचे निरीक्षण केले. डॉ. प्रदीप बर्डे आणि डॉ. गौरी दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण सर्व सेवक आणि विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने दिले जात आहे. सूत्रसंचालन डॉ. सुनील औंधकर यांनी केले.

Story img Loader