पहिल्या दिवशी पालिकांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करायला भलेही राज्याचे शैक्षणिकमंत्री उपस्थित असतील, मात्र या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करण्यासाठी ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पालिकेकडून विद्यार्थ्यांना गणवेश, बुटांसह २७ शालेय वस्तू दिल्या जातात. मात्र या वस्तू खरेदीसाठी स्थायी समितीसमोर अद्याप प्रस्तावही सादर झालेला नसून त्यानंतर प्रत्यक्ष वस्तू येण्यासाठी किमान दोन महिन्यांचा अवधी लागेल.
विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ३ जून रोजी आला होता. तेव्हाच इतर साहित्य, गणवेश यांच्या खरेदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने त्यानंतरही चालढकल सुरूच ठेवली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी महापौरांकडून काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शैक्षणिक साहित्य दिले गेले. मात्र शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्याचा प्रस्तावच सादर झालेला नाही. त्यानंतर कार्यादेश व साहित्य पाठवण्याची ४५ दिवसांची मुदत असा काळ लक्षात घेता या सर्व वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब लागणार आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी तीव्र नापसंती दाखवली. मुंबईच्या नागरिकांकडून वेळेत कर घेणारी पालिका विद्यार्थ्यांना सोयी पुरवताना मात्र उदासीन होते, अशा शब्दात रईस शेख यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. या संदर्भात त्यांनी आयुक्त अजय मेहता यांना पत्रही लिहिले असून शालेय वस्तू विद्यार्थ्यांना मिळाल्या नसल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही प्रशासनाच्या विलंबाच्या धोरणावर टीका केली. निविदा प्रक्रिया, प्रशासनाकडून छाननी, स्थायी समितीची मान्यता, कार्यादेश व साहित्य येण्यासाठी लागणारा वेळ याची पूर्ण कल्पना असूनही प्रशासन दरवर्षी शैक्षणिक साहित्याबाबत विलंब करते, असा आरोप आंबेरकर यांनी केला. गणवेशाचे एकाच रंगाचे कापड पुरवण्याची क्षमता कंत्राटदारांकडे नसल्याने दरवर्षी गणवेश खरेदीस वेळ लागतो. मात्र वर्षांनुवर्षांचा अनुभव असूनही पालिकेने कारभारात सुधारणा केलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा