शाळा ही समाजापर्यंत पोहोचली आणि समाज शाळेपर्यंत पोहोचला तर शिक्षणप्रक्रिया खऱ्या अर्थाने आकार घेते, असे मानले जाते. येत्या सोमवारी, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वांद्रे (पूर्व) येथील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या पाचवी ते दहावीचे विद्यार्थी अशाच एका अभिनव उपक्रमाचा श्रीगणेशा करणार आहेत, ज्याची नाळ थेट समाजाशी जोडली गेली आहे.
प्रजासत्ताक दिन म्हटले तर शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये शारीरिक कवायती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाच भरणा अधिक असतो. यंदा मात्र वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिराने याच्या जोडीला समाजाभिमुख उपक्रम करण्याचे योजले आहे. ही शाळा वांद्रे सरकारी वसाहतीच्या परिसरात आहे. या परिसरातील इमारती आणि चौकांमध्ये चार ते पाच मुलांचा गट जाऊन ‘स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत तो परिसर स्वच्छ करून तिथे शोभेची लहान रोपं लावणार आहेत. ‘मॅजिक बकेट’ योजनेअंतर्गत ‘ओला कचरा- सुका कचरा’ वेगळा करून खतनिर्मितीचा प्रयोगही शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे राबविण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे शाळेतील कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी सुमारे १० वाजता विद्यार्थ्यांचे गट या उपक्रमाची सुरुवात करतील.
या योजनेचे वैशिष्टय़ असे की, हा उपक्रम केवळ त्या दिवसापुरता राबविण्यात येणार नसून रहिवाशांच्या मदतीने हा उपक्रम दीर्घकाळापर्यंत राबविला जावा, असा या शाळेच्या व्यवस्थापनाचा हेतू आहे.
ही योजना दीर्घकाळ राबवणे सुकर व्हावे, याकरता त्या त्या इमारतीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट करण्यात येत आहेत. सरकारी वसाहतीतील काही इमारतींमधील रहिवाशांना तसेच सोसायटी सदस्यांना भेटून शिक्षक-विद्यार्थ्यांनी शाळेतर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची माहितीही दिली. शाळा ज्या परिसरात आहे तो परिसर सुशोभित व्हावा, पर्यावरणविषयक जागरूक व्हावा, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहेच, त्याचबरोबर या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांना समाजाभिमुख प्रकल्प प्रत्यक्षपणे राबविण्याची संधीही मिळत आहे.
याविषयी वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे सचिव मिलिंद चिंदरकर यांनी सांगितले, ‘ओळख नसलेल्या व्यक्तींसोबत संवाद साधणे, त्यांना आपला उपक्रम समजावून देणे, संबंधित रहिवाशांना या प्रकल्पात सहभागी करून घेणे.. असा प्रकल्प राबविण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा समाजाशी थेट संबंध येईल, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या भोवतालचा परिसर, समाज याविषयीची कृतज्ञता आपण कामातून व्यक्त करू शकतो आणि पर्यावरण सजगतेचा जागरही यानिमित्ताने होईल.’
सुचिता देशपांडे, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा