ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांची सहल काढायची असेल तर शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही परवानगी न घेता स्थानिक शिक्षक अधिकाऱ्यांना डावलून सहली काढत असल्याने या सहली विद्यार्थ्यांच्या जिवाला बाधक ठरत आहेत, अशी माहिती काही शिक्षकांनी दिली.
मुरबाड तालुक्यातील नागाव शाळेची सहल जवळच्या धरणावर नेण्यात आली होती. त्या वेळी पाण्यात उतरलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. शाळेच्या शिक्षिकांनी ही सहल नेली होती. शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेतील सहल स्थानिक पातळीवर किंवा दूरच्या प्रवासासाठी काढायची असेल तर संबंधित शाळेतील शिक्षकाने प्रथम तालुका गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सहलीच्या परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बस किंवा तस्सम सरकारी वाहनानेच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी असा नियम आहे. सहलीसाठी सरकारी वाहन नोंदणी केल्याची पावती तालुका शिक्षण विभागाला जमा करावी लागते. या सगळ्या परवानगीच्या प्रवासाला शिक्षण विभागाकडून विलंब लागतो. त्यामुळे काही शाळांचे शिक्षक शिक्षण विभागाला अंधारात ठेवून मनमानी करून स्थानिक किंवा दूरच्या प्रवासाच्या सहली काढून मोकळे होतात. सकाळी गेलेली सहल संध्याकाळी परत येत असल्याने साहेबांना या विषयाकडे तात्काळ लक्ष देता येत नाही. परंतु, अशा बेकायदेशीरपणे काढलेल्या सहलीच्या गाडीला किंवा विद्यार्थ्यांला अपघात झाला की मग हा विषय ऐरणीवर येतो, असे अधिकारी म्हणाला.  सहलीला जाताना विद्यार्थ्यांचे गट तयार करणे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षक असणे अशी व्यवस्था करावी लागते. परंतु, सहलीची घाई झालेले शिक्षक मौजमजेत शिक्षण विभागाला अंधारात ठेवून सहली काढतात आणि नंतर ते विद्यार्थ्यांच्या जिवाला घातक ठरते, असे सूत्राने सांगितले.

Story img Loader