राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शहर बस वाहतुकीच्या नियोजनात सुसुत्रता आणावी या मागणीसाठी सोमवारी येथील छत्रपती फाऊंडेशन विद्यार्थी आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी या ठिकाणी निदर्शनेही केली. शहर बससेवा ताब्यात घेण्याचा विषयावर महापालिकेत खडाजंगी सुरू असताना हे आंदोलन झाल्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
सध्या शाळा व महाविद्यालयात परीक्षांचा काळ आहे. सकाळ व दुपार सत्रात विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंडळाकडून वेळेवर बसची उपलब्धता केली जात नाही. संख्या कमी असल्याने बस पकडताना विद्यार्थ्यांची दमछाक होते. गर्दीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. या परिस्थितीत परिवहन महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होत आहे. महामंडळाच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाहून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी आंदोलकांनी निदर्शनेही केली.
परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसेसची संख्या वाढवावी, बसेस नियोजित थांब्यावर थांबवाव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनास करण्यात आल्या आहेत. आंदोलनात अध्यक्ष गणेश कदम, कार्याध्यक्ष सुभाष वाघ, संघटक किशोर वडजे, उपजिल्हा अध्यक्ष संतोष टिळे आदी सहभागी झाले होते.

Story img Loader