पॉलिटेक्निक प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रक्रियेदरम्यान आजपर्यंत केवळ ३९६६ अर्जाची नोंदणी झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया १७ जूनपासून राबवण्यात येत आहे.
पाचव्या दिवसापर्यंत केवळ ३९६६ अर्ज आल्याने पूर्ण जागांवर प्रवेश होतील की नाही, अशी चिंता पॉलिटेक्निक संस्था चालकांना लागली आहे. नागपूर विभागात ६२ पॉलिटेक्निक असून एकूण २४,५९५ जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी २३,९३५ जागा होत्या. यावर्षी त्यात ६६० जागांची भर पडली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याबरोबर पहिल्या काही दिवसांमध्ये प्रवेशासाठी प्रचंड गर्दी गेल्यावर्षीपर्यंत असायची. यावर्षी मात्र, उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज नोंदणी संख्या फारच कमी दिसते आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, एमई आदीच्या प्रवेश परीक्षा पार पडून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेनुसार ऑनलाईन अर्जही भरण्यात आले आहेत.
दहावीचा निकाल सात जूनला जाहीर झाल्यानंतर पदविका अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होते, याच प्रतिक्षेत विद्यार्थी व पालक होते.
नुकतीच तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले.                                                                                                                                                        यासंबंधीच्या माहिती पुस्तिक एआरसीजवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  येत्या २५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून त्या दरम्यान कागदपत्रांची छाननीही एआरसीजवर करण्यात येणार आहे. पॉलिटेक्निकची तात्पुरती गुणवत्ता यादी २७ जूनला सायंकाळी वाजता जाहीर करण्यात येईल. पालक व विद्यार्थ्यांना तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंबंधीच्या तक्रारी २८ व २९ जूनला सायंकाळी पाच वाजेपर्यंत देता येतील. त्यानंतर १ जुलैला सायंकाळी पाच वाजता अंतिम गुणवत्ता यादी तंत्रशिक्षण संचालनालय प्रसिद्ध करेल.  पर्यायी अर्ज भरण्याची मुदत २ ते ४ जुलै असून सामाजिक प्रवेश प्रक्रियेच्या(कॅप) पहिल्या फेरीची तात्पुरती यादी सहा जुलैला सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानंतर आठ ते १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांने प्रवेश घ्यायचे आहेत.
१२ जुलैला संचालनालय रिक्त जागा आणि कॅपच्या दुसऱ्या फेरीत पात्र विद्यार्थ्यांची यादी घोषित करेल.

Story img Loader