कालिना येथील ‘इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कूल’मधील विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना फेरीवाले, वाहतुकीचा खोळंबा आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या त्रासामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे या शाळेच्या गल्लीत मुलींना छेडछाडीलाही तोंड द्यावे लागते आहे. पालिका प्रशासन, पोलीस आदी यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने बुधवार, २० ऑगस्टला शाळेतील विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षक रस्त्यावर उतरून आपला विरोध व्यक्त करणार आहेत.
शाळेच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर वर्षांनुवर्षे फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. पालिका प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडते आहे. त्यांचा गोंगाट शाळेत वर्गापर्यंत ऐकू येतो. त्यामुळे अभ्यासात व्यत्यत येतोच,  शिवाय यापैकी काही फेरीवाले आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असलेले खाद्यपदार्थही विकतात. मुलांना कितीही सांगितले तरी ते हे खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात.
शाळेसमोरची गल्ली अरुंद आहे. त्यामुळे अनेकदा येथे वाहतूक खोळंबते. गाडय़ांचे हॉर्न आणि प्रदूषण यामुळे त्रासात भरच पडते. याशिवाय अपघातांचे प्रमाण वाढले आहे ते वेगळेच. या गल्लीला एअर इंडिया आणि कलिना टॉकिजला जोडणारा मिठी नदीवरील पूल हा पर्यायी रस्ता आहे. पण तो बंद असल्याने सर्व वाहतूक चेंबूर लिंक रोड किंवा सीएसटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर येऊन धडकते. शाळेसमोरचा रस्ता वाहतुकीने भरून जाण्याचेदेखील हेच कारण आहे. या वाहतुकीच्या गर्दीमुळे विद्यार्थिनींना व शाळेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही शाळेत वेळेवर पोहोचण्यात अडचण येते.
यापेक्षा गंभीर बाब म्हणजे गल्लीतले वाढलेले छेडछाडीचे प्रकार. गल्लीत वाहतूक, फेरीवाले यामुळे मुलींना या प्रकारांनाही सध्या तोंड द्यावे लागत आहे, असे बॉम्बे कॅथॉलिक सभेचे अध्यक्ष आणि पालक-शिक्षक संघटनेचे समन्वयक डॉमनिक डिसोझा यांनी सांगितले.
वर्षांनुवर्षे विद्यार्थिनींना व शिक्षकांना या त्रासाला तोंड द्यावे लागत असल्याने अखेर आम्ही रस्त्यावर उतरण्याचे ठरविले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या त्रासाविरोधात शाळेच्या विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षक बॉम्बे कॅथॉलिक सभेसोबत बुधवारी सकाळी ९ वाजता शांततापूर्ण मोर्चा काढणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा