स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थी पहिला येण्यासाठी धडपडत असतो. पण ही धडपड आयुष्यात एखाद्या वर्षी कमी पडली तर विद्यार्थी नाऊमेद होतो. त्यामुळे कोणतेही शिक्षण घेताना पहिला क्रमांक येण्यासाठी न घेता आयुष्य घडविण्यासाठी घ्यावे, असे मत प्रसिद्ध चित्रपट-नाटय़ अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे होते. प्र-कुलगुरू डॉ. दिलीप उके, कुलसचिव डॉ. टी. ए. कदम, नाटय़लेखक-दिग्दर्शक संदेश कुलकर्णी, अभिनेत्री केतकी थेटे, समन्वयक प्रा. रामचंद्र शेळके उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. आगाशे म्हणाले की, पुस्तके व शब्दांतून शिक्षण घेणे ही सध्याच्या पिढीची परंपरा असली तरी ती पुरेशी परिपक्व नाही. शिक्षण ही बौद्धिक व्यायामशाळा आहे, पण त्याचा उपयोग अनुभवातूनच शिकता येतो. अनुभव व माहिती यांच्यातील दरी कमी होणे गरजेचे आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी चांगलेच विद्यार्थी असावे लागतात. कुलगुरू डॉ. निमसे म्हणाले की, मराठवाडय़ात कलाकारांची कमतरता नाही. गरज आहे ती त्यांना मार्गदर्शनाची, योग्य वेळी योग्य व्यासपीठ देण्याची. यात विद्यापीठ कमी पडणार नाही, अशी ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली.