पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चे आव्हान दिले आणि देशभरात विविध स्तरांवर स्वच्छता मोहिमांची सुरुवात झाली. यातील काही दिखाऊ होत्या तर काही मोहिमांचा कालावधी फारच कमी होता. यामुळेच बडय़ा लोकांच्या दिखाऊपणानंतर आता कचरा ‘कुंडीत’ टाकण्यासाठी विद्यार्थीच रस्त्यावर उतरणार आहेत. 

बृहन्मुंबई परिसरातील कचरा व्यवस्थापनाबाबत जागृती मोहीम हाती घेऊन स्थानिक पातळीवरील समस्या जाणून त्याचा एक अहवाल थेट मुंबई महापालिकेला सादर करण्याचा चंग साठय़े महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बांधला आहे. यासाठी त्यांनी एक अभियान आखले असून या अभियानाची सुरुवात १ डिसेंबरपासून होणार असून ते अभियान १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या अभियानामध्ये नागरिकांना प्राथमिक शिस्त लावण्यापासून प्रशासकीय त्रुटी शोधून त्याचा अहवाल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याने हे अभियान केवळ काही काळापुरते मर्यादित राहणार नसून त्याचा एक विशेष परिणाम होईल अशी अपेक्षा अभियानाची संकल्पना मांडणारे महाविद्यालयाचे बीएमएम समन्वयक प्रा. गजेंद्र देवडा यांनी स्पष्ट केले. या अभियानात बीएमएम आणि एमएसीजेचे विद्यार्थी सहभागी होणार असून ते राहत असलेल्या परिसरामध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. सध्या शहरातील ६० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांवर विद्यार्थी कचरा ‘कुंडीत’च टाका असे आवाहन करणारे फलक घेऊन उभे राहणार आहेत. तरीही जर कुणी कचरा कुंडीच्या बाहेर टाकला तर त्या व्यक्तीला विनंती केली जाईल. तसे नाही झाले तर विद्यार्थी तो कचरा कुंडीत टाकतील आणि त्या नागरिकाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देतील. यानंतर त्या विभागातील कचरा व्यवस्थापनाबाबत नेमक्या काय समस्या आहेत याची माहितीही विद्यार्थी गोळा करणार आहेत. या माहितीतून एक अभ्यासात्मक अहवाल तयार केला जाणार असून तो त्या विभागातील नगरसेवक आणि पालिका प्रशासनाकडे दिला जाणार असल्याचे देवडा यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर विभागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाडय़ांजवळ छोटय़ा-छोटय़ा कचऱ्याच्या बादल्या देण्याचाही मानस असल्याचे देवडा यांनी स्पष्ट केले. हे अभियान केवळ विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित नसून यामध्ये स्थानिक नागरिक आणि समाजातील विविध घटक सहभागी होऊ शकतील. इतकेच नव्हे तर एखाद्या समाजसेवी संस्थेची मदत मिळवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे देवडा यांनी स्पष्ट केले. स्वच्छ भारत अभियानासाठी योगदान द्यावे असे वाटले आणि या अभियानाची संकल्पना आखण्यात आली. ही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली, त्यांना ती आवडली. तसेच प्राचार्य कविता रेगे यांनाही संकल्पना सांगितल्यावर त्यांनी यात मार्गदर्शन करून ती मान्य केल्याचे देवडा यांनी स्पष्ट केले.