शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चार अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर (पीजी)च्या जागा वाढविण्याचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने भारतीय वैद्यक परिषदेकडे पाठविला असला तरी यावर गेल्या वर्षभरात कुठलीच चर्चा करण्यात आली नसून भारतीय वैद्यक परिषदेकडे धूळखात पडून आहे.
शासकीय वैद्यकीय माविद्यालयात चार अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तरच्या जागा वाढविण्यासंदर्भात भारतीय वैद्यक परिषदेला गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर जवळपास तास वेळा त्याचा पाठपुरावा एमसीआयकडे करण्यात आला मात्र त्यांनी या प्रस्तावाची दखल घेतली नाही.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी मेडिकल प्रशासनाने पुन्हा एकदा पाठपुरावा केला असताना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ‘एमसीआय’च्या चमूने येण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे मेडिकल प्रशासनाने अहवाल तयार ठेवला होता मात्र वर्ष संपायला काही तास उरले असताना ‘एमसीआय’ची चमू उपराजधानीत अवतरली नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शेकडो वैद्यकीय विद्यार्थी विविध अभ्यासक्रमाचे पदव्युत्त शिक्षण घेत आहेत. पदव्युत्तर शिक्षणाच्या काही जागा वाढून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी वर्षभरापूर्वी मेडिकल प्रशासनाने रेडिओलॉजी, फॉरेन्सिक मेडिसीन, आर्थोपेडिक, स्किनव्हीडी या चार अभ्यासक्रमाच्या १५ते २० जागा वाढविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तो भारतीय वैद्यक परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. काही दिवस हा प्रस्ताव धूळखात पडल्यानंतर एक महिन्यापूर्वी या प्रस्तावावर चर्चा करून एमसीआयच्या चमूने नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात निरीक्षणासाठी येण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे मेडिकल प्रशासनाने तयारी केली होती मात्र, डिसेंबर महिना संपायला काही तास उरले असताना एमसीआयची चमू उपराजधानीत पोहोचली नाही.
नवीन वर्षांच्या पहिल्या महिन्यात एमसीआयची चमू येण्याची शक्यता प्रशासनातील अघिकाऱ्यांनी व्यक्त केली असली तरी त्यांच्याकडून मात्र कुठलीच सूचना नाही त्यामुळे पीजीचा प्रस्ताव सध्या तरी थंडबस्त्यात असल्याचे सूत्रानी सांगितले.