पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला आव्हान देत नवी मंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने वाशीनगरीत पुन्हा एकदा पोटनिवडणुकीचे बिगूल वाजू लागले आहे. कचरा वाहतुकीच्या सुमारे २३४ कोटी रुपयांच्या वादग्रस्त कंत्राटाविरोधात जाहीर भूमिका घेत महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा मोरे यांनी दोन महिन्यांपूर्वी वाचला होता. तेव्हाच त्यांचा शिवसेनेच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याची चर्चा होती. शनिवारी ही औपचारिकता पूर्ण झाली असली तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीत महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजेल, असे चित्र दिसू लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेतील अभियंता विभागातील कोटय़वधी रुपयांच्या कंत्राटांमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसाठी अडचणीची ठरू लागली आहेत. नेरुळ येथील वंडर्स पार्कच्या शुभारंभापूर्वी या भागात विद्युत वाहिनी टाकण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचे दिलेले कंत्राट वादात सापडले आहे. निविदा प्रक्रियेत एकमेव कंत्राटदार असतानाही त्याच कंत्राटदाराला हे कंत्राट बहाल करून आयुक्त भास्कर वानखेडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यापूर्वी कचरा वाहतुकीचे सुमारे २३४ कोटी रुपयांचे कंत्राट वादात सापडले असून, महापालिकेतील अभियंता विभागातील महत्त्वाच्या कामांमध्ये उघडपणे टक्केवारी सुरू झाल्याची चर्चाही आता रंगली आहे. नवी मुंबईतील एका बडय़ा नेत्याने मध्यंतरी कंत्राटदारांच्या एका बैठकीत याविषयी जाहीरपणे वाच्यता केल्याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही हादरले आहेत. ‘रोडमॅप’ या टोपणनावाने कंत्राटी कामांमध्ये सुरू झालेली टक्केवारीची वसुली सध्या महापालिका वर्तुळात चर्चेत असून या पाश्र्वभूमीवर विठ्ठल मोरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याने शहरातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
मोरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यापूर्वी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्त भास्कर वानखेडे यांच्याकडे दिला. यामुळे वाशी सेक्टर सहा ते आठ या प्रभागात पोटनिवडणूक होणार हे स्पष्ट आहे.
नवी मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारविरहित करणार, अशी घोषणा करीत अडीच वर्षांपूर्वी गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकीत एकहाती विजय संपादन केला, मात्र महापालिकेत सध्या जोरदार टक्केवारी सुरू झाल्याचा आरोप यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेने केला आहे. ‘माझ्या नगरसेवकांना सुपारीचा खांडसुद्धा खाऊ देणार नाही,’ अशी भाषा करणारे पालकमंत्री विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या या आरोपांना कसे उत्तर देतात, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
मोरे यांच्या राजीनाम्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा वाजविण्याची तयारी करण्यात आली आहे. या आरोपांना उत्तर देत मोरे यांना पोटनिवडणुकीत धूळ चारण्याचे बेत राष्ट्रवादीत आखले जात असून, मोरे यांना घरच्या मैदानात धूळ चारण्यासाठी माजी नगरसेविका विजय ठाकूर यांना उमेदवारी देण्याची तयारीही सत्ताधारी पक्षातर्फे केली जात असल्याचे वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा