देशभरात निर्माण झालेल्या मोदी लाटेच्या प्रभावाखाली धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. अमरिश पटेल यांचा एक लाख ३० हजार ७२३ मतांनी दणदणीत पराभव केला. आ. पटेल वगळता उर्वरित १७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. प्रत्येक फेरीत भामरे यांची आघाडी वाढतच गेली.
डॉ. भामरे यांना तब्बल पाच लाख २९ हजार ४५० मते पडली. तर, आ. पटेल यांना तीन लाख ९८ हजार ७२७ मते मिळाली.  सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये जल्लोष करण्यात आला. धुळे मतदारसंघ आ. पटेल यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून पटेल यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढविल्याने आणि खास करून शिरपूर पॅटर्नचे प्रचार यंत्रणेत प्रभावीपणे वापरल्याने आ. पटेल यांचे पारडे डॉ. सुभाष भामरे यांच्या तुलनेने जड होईल असे वाटले होते. परंतु नरेंद्र मोदी यांची देशभरातील लाट डॉ. भामरे यांना तारून नेण्यास प्रभावी ठरली.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच फेरीत आ. पटेल यांना धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एक हजार ५३४ तर डॉ. भामरे यांना तीन हजार ८५४ मते पडली. धुळे शहरातून पटेल यांना एक हजार २०९ तर डॉ. भामरेंना सात हजार ४७० मते मिळाली. शिंदखेडय़ातून पटेल यांना दोन हजार ४६९ तर, डॉ. भामरेंना चार हजार २२ मते मिळाली. मालेगाव मध्य मतदारसंघाने पटेल यांच्या पारडय़ात तब्बल नऊ हजार २०३ मते टाकली. या ठिकाणी भामरे यांना केवळ ३५९ मते मिळाली. मालेगाव ग्रामीणमधून डॉ. भामरे यांना पाच हजार १४, तर आ. पटेल यांना एक हजार २७५ मते, बागलाण मतदारसंघातून पटेल यांना पाच हजार ३८१ तर, डॉ. भामरे यांना दोन हजार ५४५ मते मिळाली. पहिल्या फेरीअखेर पटेल यांना २१ हजार ७१ तर, डॉ. भामरे यांना २३ हजार २६५ मते मिळाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतही डॉ. भामरे व पटेल यांच्यात अशीच कमी-अधिक फरकाने स्पर्धा सुरू होती. पुढे अकराव्या फेरीपासून मात्र दोन्हीही उमेदवारांमधील मतांमध्ये अधिक अंतर पडत गेले. भामरे यांनी विसाव्या फेरीअखेर तब्बल चार लाखांचा आकडा पार केला. यावेळी पटेल हे मात्र पावणेचार लाख मतांच्या आसपास राहिले. २७ व्या फेरीत डॉ. भामरे यांना पाच लाख २९ हजार ४५० तर पटेल यांना तीन लाख ९८ हजार ७२७ मते मिळाली. आणि डॉ. भामरे हे तब्बल एक लाख ३० हजार ७२३ मताधिक्याने विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश महाजन यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा