गोंदिया येथील सुभाष बागेच्या सौंदर्यीकरणासाठी अंदाजित अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. साडेतीन लाख रुपयाच्या निधीतून या उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला असून लवकरच सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असण्याची माहिती मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.
या निधीतून सुभाष बागेत मेहंदीची लागवड, अशोकांची झाडे व लॉन याकरिता ३० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. यासोबतच बागेत धार्मिक वातावरण निर्मितीसाठी लावण्यात आलेला साऊंड सिस्टमच्या दुरुस्तीसाठी १० हजार रुपये, बागेच्या मध्यभागी असलेल्या फवाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २० हजार रुपये, बालकांसाठी नवीन व आधुनिक खेळणी, व्यायाम सामुग्री, रेती टाकण्यासाठी १० हजार रुपये, सूचना फलक व बोर्ड लावण्यासाठी ५ हजार रुपये, बागेत प्रकाश व्यवस्था व सजावटीसाठी ५ हजार रुपये, स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी ५ हजार रुपये, कचरापेटय़ांसाठी २५ हजार रुपये, अशी तरतूद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या बागेला तहसील कार्यालयाकडून असलेल्या गेटमधून बाहेरील वाहने सरळ बागेत आणली जातात. या ठिकाणी पार्किंग नसल्याने वाहने अस्ताव्यस्त उभी राहतात. त्यामुळे या गेटला कायमचे बंद करण्यासाठी ४० हजार रुपयांचा अंदाजित खर्च नियोजित करण्यात आला आहे.
सुभाष बागेत दुरावस्थेत असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या रंगरंगोटी करण्यासाठी ४० हजार रुपये, कार्यालय पेंटिंगकरिता १० हजार रुपये, भंग पावलेल्या मूर्तीची दुरुस्ती व पेंटिग, ग्रील पेंटिंगकरिता १० हजार रुपये, तर सिमेंट खुच्र्या दुरुस्तीसाठी १० हजार रुपयांचा अंदाजित खर्च नियोजित करण्यात आला आहे.
एकंदरीत संपूर्ण सुभाष बागेच्या सौंदर्यीकरणाच्या हेतूने पेटिंगसाठी ३५ हजार रुपये, बोर्डासाठी ५ हजार रुपये, साऊंड सिस्टम १० हजार, वृक्ष लागवड व देखभालीसाठी ३० हजार रुपये, खेळणीसाठी १० हजार व झुंबर व लाईटकरिता ५ हजार, असे ९५ हजाराचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या बागेच्या दुरावस्थेसंदर्भात नगरसेविका भावना कदम यांनी पालिकेकडे अर्ज सादर केला होता. हा प्रस्ताव सभेत दिनेश दादरीवाल यांनी ठेवला व अनुमोदक राकेश ठाकूर होते. या ठरावावर लवकरच कार्यप्रणाली होणार असून सुभाष बागेच्या सौंदर्यीकरण होणार आहे, अशी माहिती गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा