उपेक्षित, समाजाच्या उतरंडीत खूपच खालच्या स्तरावर असलेल्या अनेक घटकांवर सध्या मराठी चित्रपटसृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. सुशिक्षित, सुसभ्य आणि प्रगतिशील मानल्या जाणाऱ्या आपल्या समाजातील काही घटक अद्यापही अशा प्रकारचे आयुष्य जगत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. चित्रपटांद्वारे समाजप्रबोधन वगैरे करणे, ही खूप काव्यात्मक कल्पना असली, तरी आपण काम करत असलेल्या चित्रपटाचा विषय प्रेक्षकांच्या जाणीवकक्षेला भिडायला हवा, अशी अपेक्षा उपेंद्र लिमये याने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केली.
खान्देशातील आदिवासींच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘तुह्या धर्म कोणचा?’ या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा मारताना तो बोलत होता. हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
चित्रपट पाहिल्याने समाजप्रबोधन होते, ही कल्पना खूप काव्यात्मक आहे, पण आपण एका सुरक्षित वातावरणात वाढलेलो असतो. पुण्या-मुंबईपलीकडेही जग आहे, याची जाणीव अनेकांना नसते. मात्र एक माणूस म्हणून आपल्याला शहरी जीवनाच्या पलीकडचे जगही खुणावत असते. या जगातील लोकांची दु:खे, त्यांची परिस्थिती आपल्याला अस्वस्थ करते. मग किमान ती दु:खे समजून घेण्याचा प्रयत्न म्हणून आपण आपल्या भूमिकेकडे पाहतो, असे उपेंद्र म्हणाला.
‘तुह्या धर्म कोणचा?’मध्ये उपेंद्र कवडू नावाच्या एका आदिवासी माणसाची भूमिका करत आहे. शहरापासून शेकडो मैल लांब असलेल्या या भागात शहरी शक्तींचा कसा विपरीत प्रभाव पडतो आणि एका आदिवासी कुटुंबाचे जगणे कसे बदलते, या विषयावर हा चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट पाहून लोक बदलतील, असे आपले म्हणणे नाही.
मात्र किमान त्यांना या एका मानवसमूहाच्या जगण्याच्या संघर्षांबाबत जाणीव तरी होईल, असे उपेंद्रने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा