पाण्यावरून चालणे, २००० अंश सेल्सियस तापमानातही न जळणारा कागद, टाकाऊ प्लास्टिक वापरून टिकाऊ वस्तू बनविणारा थ्रीडी प्रिंटर असे नानाविध तंत्रज्ञान आणि विज्ञानाचे प्रयोग आयआयटी मुंबईत पार पडलेल्या पदार्थ विज्ञान शाखेच्या ‘पदार्थ’ महोत्सवात बघावयास मिळाले. या महोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्माण’ या स्पध्रेत हैदराबाद येथील ‘विज्ञानाना भारती’ संस्थेने बाजी मारली.
आयआयटी मुंबईच्या संकुलात या महोत्सवामुळे रविवार ‘विशेष’ झाला. परिसरातील काही हौशी मंडळींनीही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ही झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. यामध्ये पाण्यावरून चालण्याचा अनुभव सर्वानी घेतला. पाण्यात विशिष्ट प्रकारचे रसायन मिसळले की पाण्यावर चालणे सोपे होते, हे दाखवून देण्यासाठी या महोत्सवात हा प्रयोग ठेवण्यात आला होता. याशिवाय सर्वाच्या आकर्षणाचा विषय ठरला तो म्हणजे थ्रीडी पिंट्ररचा. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या या प्रिंटरच्या माध्यमातून कचऱ्यात आढळणाऱ्या प्लास्टिकचा वापर करून विविध वस्तू बनविण्यात आल्या. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या थ्रीडी प्रिंटर्ससाठी विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक वायर्सचा वापर करावा लागतो. यामुळे हा प्रिंटर वेगळा आकर्षणाचा विषय ठरला होता. हा प्रिंटर पोर्टेबल असून तो कुठेही नेणे शक्य होते.
याशिवाय प्रदर्शनात दाखविण्यात आलेली पाण्यात न विरघळणारी मातीही सर्वाच्या उत्सुकतेचा विषय होती. आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी ही अनोखी माती तयार केली असून मातीमध्ये एक विशिष्ट प्रकारचे रसायन मिसळले की ती माती पाण्यातही तग धरू शकते. या आणि अशा अनोख्या प्रयोगांमुळे आयआयटीअन्स मंत्रमुग्ध झाले होते.
या महोत्सवादरम्यान विविध स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे सामाजिक भान ओळखण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा ‘निर्माण’ स्पध्रेचाही समावेश होता. या स्पध्रेत देशभरातून १२ संघ सहभागी झाले होते. यात हैदराबाद येथील ‘विज्ञानाना भारती’ संस्थेने बाजी मारली. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी
एका स्वस्त जलशुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पामुळे जलशुद्धीकरणाच्या सध्या येणाऱ्या खर्चात किमान २० टक्क्यांची बचत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा