गेली दोन वर्षे ‘नाकाला सूत’ लागलेल्या बोरिवलीच्या भगवती रुग्णालयाने गेल्या आठवडय़ात अखेर ‘अखेरचा श्वास’ घेतला आणि उपनगरातील रुग्ण पुन्हा एकदा पोरके झाले. उपनगरात अत्याधुनिक सेवा देणारे रुग्णालय बांधण्याचे आश्वासन गेली दहा वर्षे देत असलेली महानगरपालिका कांदिवली येथील आंबेडकर व विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयही पूर्ण क्षमतेने सुरू करू शकलेली नाही. त्यामुळे अपघात, आपत्कालीन परिस्थितीत उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना आजही केईएम, नायर व सायनकडेच धाव घ्यावी लागत आहे.  पालिकेची मुंबईभर १६ रुग्णालये आहेत. मात्र वांद्रय़ाचे भाभा आणि घाटकोपरचे राजावाडी वगळता अन्य सर्व रुग्णालये प्रत्यक्षात ‘बहुमजली दवाखाने’च आहेत. बोरिवलीचे भगवती रुग्णालय हे पश्चिम उपनगरातील रुग्णांसाठी सोयीचे होते. मात्र इमारत मोडकळीस येऊनही टेंडरप्रक्रियेत अडकल्याने या रुग्णालयाचा विकास रखडला. गेल्या वर्षांपासून बांधकामाला सुरुवात झाली. अलीकडेच डॉकयार्ड इमारत कोसळल्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने गेल्या आठवडय़ात रुग्णालय बंद केले. हे रुग्णालय पुन्हा पूर्ण सुरू होण्यास किमान तीन वर्षे लागणार आहेत. अखेपर्यंत या रुग्णालयाच्या अपघात विभागात गर्दी कायम होती. कांदिवलीचे आंबेडकर रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने आता पुन्हा आधीच गर्दी असलेल्या केईएम, सायनकडे धावण्याशिवाय पर्याय नाही, असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.
उपनगरांतील पालिकेच्या विविध रुग्णालयांची सद्यस्थिती
आंबेडकर, कांदिवली – १३ वर्षे बंद राहिल्यानंतर या वर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या टप्प्याचे उद्घाटन. अजूनही पूर्ण कार्यक्षमतेने सुरू नाही. डॉक्टर व नर्सच्या जागा पन्नास टक्के जागा रिक्त.
सावरकर आणि देसाई, मालाड- अपघात विभागासाठी कोणतीही यंत्रणा नाही. एक्स-रे, पॅथॉलॉजी सेवा दहा ते पाच या वेळेतच उपलब्ध. प्रसूतिगृह म्हणूनच उपयोग. मोठय़ा दवाखान्याएवढी सुविधा.
सिद्धार्थ, गोरेगाव – केवळ लहान शस्त्रक्रियांपुरते मर्यादित. कोणतीही मोठी शस्त्रक्रिया होण्यासाठी पायाभूत सुविधा नाहीत.
कूपर, विलेपार्ले – लवकरच सुरू करण्यात येणार, असे गेली दोन वर्षे आश्वासन. पालिका निवडणुकांच्या तोंडावर घाईघाईने पहिल्या टप्प्याचे उद्घाटन. मात्र अजूनही संपूर्ण रुग्णालयासाठी मुहूर्त सापडलेला नाही.
व्ही. एन. देसाई, सांताक्रूझ-पश्चिम द्रुतगती मार्गावरील अपघातांसाठी हे रुग्णालय सुसज्ज करण्याचा विचार कधीही पूर्णत्वास गेला नाही. तज्ज्ञ, निमवैद्यकीय सेवा, उपकरणे या सर्वच स्तरांवर कमकुवत.

Story img Loader