मजुरांचा अभाव, पावसाचा बेभरवसा आणि आजच्या तरुण पिढीकडे प्रचंड कष्ट करण्याची तयारी नसल्याने जमिनी असूनही शेती व्यवसाय उघडय़ावर पडला आहे. अशा परिस्थितीत सरकारी खात्यातील नोकरी आणि लाखो रुपयांचा फायदा करून देणारी कंत्राटी सोडून ६४व्या वर्षी शेती व्यवसायात लक्ष घालून त्यात प्रगती साधण्याची किमया उरण तालुक्यातील जनार्दन यादव थळी यांनी केली आहे. त्याची दखल खुद्द रायगड जिल्हा परिषदेने घेतली असून, परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने नुकताच त्यांचा प्रगत शेतकरी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
रायगड जिल्ह्य़ातील जमिनी शेतीविना पडून आहेत. त्या जमिनींचा वापर औद्यागिक प्रकल्प, रस्ते, धरणे आदी कामांसाठी होऊ लागल्याने रायगड जिल्ह्य़ाची शेतकऱ्यांचा जिल्हा ही ओळख संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे. मेहनत आणि पैसा टाकूनही शेती करावीशी वाटत नसल्याने शेतीची विक्री करून एकदाचे मोकळे व्हावे, असा विचार सध्या शेतकऱ्यांच्या नव्या पिढीत रूढ होऊ लागला आहे. अशी गंभीर परिस्थिती असतानाही उरण तालुक्यातील नागाव येथील जनार्दन यादव थळी यांनी शेती व्यवसायात लक्ष घातले. थळी हे केंद्र सरकारच्या ओएनजीसी कंपनीमध्ये नोकरीला होते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कंत्राटदारीचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत असे. असे असताना त्यांचे काळ्या मातीवर असलेले विलक्षम प्रेम काही हटले नाही. या प्रेमापोटी अखेर त्यांनी सर्व काही सोडून शेतीत रममान व्हावे असा निर्णय घेतला. आज वयाच्या ६४ वर्षी ते एका दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. असे असतानाही त्यांनी शेतीच्या कामात लक्ष घातले आणि त्यामध्ये त्यांनी प्रगती साधत आपला आदर्श तरुणांपुढे निर्माण केला आहे.
जेमतेम दोन हेक्टर जमीन असताना, परंतु त्यापैकी काही जमीन घरांनी व्यापली गेल्याने शिल्लक असलेल्या जमिनीत थाळी यांनी शेती व्यवसाय सुरू केला. पहाटे ५ वाजल्यापासून थळी यांच्या शेतीच्या कामास सुरुवात होते. कोणी मदतीला असतील तर त्यांच्यासह अन्यथा एकटय़ानेच ते शेतीच्या कामात ते रममान होत असतात. दिवसातील तब्बल बारा तास शेतीत न थकता ते आज काम करीत आहेत. थळी यांच्या शेतात पावसाळ्यात भातशेती केली जाते. त्यांना यामधून ४० ते ५० क्विंटल तांदूळ मिळतो. भात पिकानंतर याच शेतात वांगी, पालक, मेथी, मुळा आदी प्रकारच्या भाजीची लागवड शेतात केली जाते. दिवसाकाठी ४० ते ५० किलो भाजी उरणच्या बाजारात घाऊक पद्धतीने विक्री केली जाते. जोडीला आंबे, सुपारी, नारळ आदींचीही लागवड थळी यांनी केली आहे. यातूनही काही उत्पन्न त्यांना मिळत असते. थळी यांचे तीन जणांचे कुटुंब आहे. कुटुंबासाठी महिन्याला सात ते आठ हजार रुपये इतकेच उत्पन्न मिळते. असे असले तरी काळ्या मातीत रमत काम केल्याचे समाधान हे मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे असे थळी सांगतात. एकीकडे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना, तर दुसरीकडे दुर्धर आजारावरही मात करून काळ्या मातीची सेवा कशी करता येते, याचे उत्तम उदाहरणच थळी यांनी दाखवून दिले आहे.