ठाण्याचे पुढील अडीच वर्षांचे महापौरपद सर्वसामान्य संवर्गासाठी खुले झाल्यामुळे या प्रतिष्ठेच्या पदावर वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी शिवसेनेत खरेतर इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू व्हायला हवी. यंदा मात्र नेमके उलटे चित्र सत्ताधाऱ्यांच्या गोटात दिसू लागले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या महापौर निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विधानसभेवर डोळा ठेवून असलेल्या इच्छुकांना प्रतिष्ठेचे महापौरपद अचानक नकोसे वाटू लागले आहे. महापौरपदाचा विषय निघाला तरी शिवसेनेतील काही दिग्गजांच्या कपाळावर आठय़ा पडू लागल्या असून विधानसभेचे तिकीट कापण्यासाठी वरिष्ठ नेते महापौरपदाचे गाजर पुढे करतील या भीतीने आतापासूनच यापैकी काहींना घाम फुटू लागला आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद असल्यामुळे येथून निवडणूक लढण्यास पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांनी काही दिवसांपूर्वी सात नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने या मतदारसंघातील इच्छुकांमध्ये चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. फाटकांचा वाढदिवस एरवी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात जल्लोषात साजरा होतो, असा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र ठाणे शहरातील नाक्यानाक्यांवर त्यांच्या वाढदिवसाचे फलक लागले. काही ठिकाणी तर त्यांचा उल्लेख थेट ‘बॉस’ असा करण्यात आल्याने पक्षाचे संपर्कप्रमुख एकनाथ िशदे यांच्या समर्थकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. फाटक समर्थकांचे हे फलकप्रदर्शन विधानसभेच्या उमेदवारीचे ‘फाटक’ उघडण्यासाठी सुरू असल्याची चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे.  शिवसेनेतून अन्यही काही जण ठाणे शहरासाठी इच्छुक असले तरी फाटक यांच्या चंचुप्रवेशामुळे पक्षातील एका मोठय़ा गटात अस्वस्थता आहे.
महापौरपदाचा गुगली
शनिवारी निघालेल्या सोडतीत ठाण्याचे पुढील अडीच वर्षांचे महापौरपद खुल्या संवर्गासाठी आरक्षित झाल्याने शिवसेनेतील राजकीय घडामोडींनी कमालीचा वेग घेतला आहे. ठाणे महापौरपद संपूर्ण जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेचे मानले जात असले तरी शिवसेनेतील दिग्गज मात्र प्रथमच या पदापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्नात आहेत. फाटक यांच्या बंडामुळे पालिकेत शिवसेनेकडे एकहाती बहुमत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या महापौर निवडणुकीसाठी पक्षातून एखादे नाव जाहीर झाले तर निवडून येण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहणार आहे. विधानसभेची निवडणूक महापौर निवडीनंतर होणार असल्यामुळे आमदारकीचे स्वप्न बाळगून असलेल्या इच्छुकांना महापौरपदाचे गाजर नकोसे वाटू लागले आहे. महापौरपदासाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांच्यासह अशोक वैती, विलास सामंत, नरेश म्हस्के, संजय मोरे अशी काही नावे चर्चेत आहेत. विद्यमान महापौर हरिश्चंद्र पाटील यांची कारकीर्द पाहता त्यांचा या पदासाठी पुनर्विचार होईल, अशी शक्यता शिवसेनेच्या गोटात कमीच दिसते. त्यामुळे वैती, सामंत, म्हस्के, मोरे ही नावे आघाडीवर आहेत. यापैकी काहींना विधानसभेचे वेध लागल्याने ‘महापौरपद नको रे बाबा’, असा यापैकी अनेकांचा सूर आहे. शहरातील शिवसेनेची ताकद पाहता आमदारपदी दीर्घ काळ मांड ठोकता येऊ शकते. त्यामुळे अडीच वर्षांचे महापौरपद नको, असा एकंदर सूर व्यक्त होऊ लागला आहे. वरिष्ठ नेते मात्र या घडामोडींमुळे खूश असून खुल्या संवर्गामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यापैकी एकाला ‘अ‍ॅडजस्ट’ करणे सोयीचे जाणार आहे.
अशोक वैती, नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्याकडे यासंबंधी विचारणा केली असता ‘पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहोत’, असे या तिघांनीही सांगितले. ‘मी शिवसेनेत कोणत्याही पदावर डोळा ठेवून आलेलो नाही’, असे फाटक यांनी सांगितले, तर ‘पक्षाचा आदेश माझ्यासाठी नेहमीच शिरसावंद्य राहिल्याचे’ म्हस्के म्हणाले. अशोक वैती यांनी तर ‘मला इच्छुक वगैरे म्हणू नका’, असे स्पष्ट केले.

Story img Loader