महाविद्यालयीन काळातील स्वत:च्या प्रेमाचा संघर्ष लिहून ठाण्यातील सुदीप नगरकरने इंग्रजी लेखन विश्वामध्ये पदार्पण केले. त्या अनुभवातून साकारलेली त्याची पुस्तके सुरुवातीपासूनच वाचकांनी उचलून धरत ‘बेस्ट सेलर’ ठरवली. याच वाचकांच्या जोरावर सुदीपने आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करत आणखी काही नवीन पुस्तकांचे लेखन केले. सुदीपने दिल्लीतील एका रॉक बॅण्डच्या लोकप्रियतेची आणि त्याच्या तुटण्यापर्यंतची कथा आपल्या चौथ्या कादंबरीत लिहिली आहे. ‘यु आर नॉट माय टाईप’ ही त्याची चौथी कादंबरी असून भारतीय इंग्रजी साहित्य विभागात दहाव्या क्रमांकाची विक्री असलेले पुस्तक ठरले आहे.
ठाण्यातील खोपट परिसरामध्ये सुदीप नगरकर राहत असून नवी मुंबईतल्या दत्ता मेघे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतले आहे. २०१० साली त्याने कॉलेजच्या काळातील प्रेमावर आधारित ‘फ्यू थिंग्जस् लेफ्ट अनसेड’ ही कादंबरी लिहिली होती. कॉलेजच्या काळातील प्रेम आणि त्यानंतरचा विरह असे कथानक या पुस्तकामध्ये त्याने लिहिले होते. सुमारे अडीच लाखांच्या घरामध्ये त्या पुस्तकाची विक्री झाली असून ‘यंगस्टर नॅशनल बेस्ट सेलर’ हा किताब त्याला मिळाला. वाचकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या कादंबरीचा दुसरा भाग सुदीपने लिहिला आणि ‘दॅटस् द वे वुई मेट क्या.. लाइफ होगी सेट’ ही दुसरी प्रेमावर आधारित कादंबरी लिहली.
सुदीपच्या दोन्ही कादंबऱ्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. तर त्यानंतर सुदीपने त्याच्या मित्रांच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी ‘इट स्टार्टेड विथ फ्रेंड रिक्वेस्ट’ ही कादंबरी लिहिली होती. त्याच्या दुसऱ्या कादंबरीच्या ७५ हजारांहून अधिक प्रती विक्रीस गेल्या आहेत. तर तिसऱ्या कादंबरीच्या सुमारे ५० हजारांहून आधिक प्रती संपल्या आहेत. सुदीपने लिहिलेल्या चौथ्या कादंबरीत एका रॉक बॅण्डच्या जन्माची, तो लोकप्रिय होण्याची आणि तो तुटण्यापर्यंतची कथा आहे. सुदीपचे हे पुस्तक ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी दिल्ली येथे प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या १५ हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्या असून हे पुस्तक सर्वाधिक विक्री असलेल्या भारतीय इंग्रजी साहित्य विभागात दहाव्या क्रमांकाला पोहचले आहे.
अशी आहे कथा..
दिल्लीतल्या एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विक्रांत, अनामिका आणि युवी या तीन मित्रांची ही गोष्ट सुदीपने आपल्या चौथ्या पुस्तकात लिहिली आहे. हे तिघे ‘वायु’ नावाच्या रॉक बॅण्डची स्थापना करतात. त्यांचा हा बॅण्ड लोकांच्या पसंतीला उतरतो, इतरांच्या तुलनेत त्यांच्या मागे प्रसिद्धीचे वलय निर्माण होते. मात्र त्याच वेळी या बॅण्डमध्ये असलेल्या या तिघांमध्ये वितुष्ट येते. त्यातून एकमेकांबद्दलच्या मतांमध्ये होणारे बदल आणि या बॅण्डची होणारी ताटातूट या कादंबरीत सुदीपने साकारली आहे.

Story img Loader