पश्चिम नागपूर
पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी असतानादेखील आघाडी सरकारविरोधी जनभावना व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव यामुळे पश्चिम नागपुरातील विद्यमान आमदार भाजपचे सुधाकर देशमुख यांना आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळाले. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणा-या फडणवीस यांचे हात मजबूत करण्याच्या भावनेने व त्यांच्या जनसंपर्कामुळे या मतदारसंघातील मतदारांनी देशमुख यांना दुस-यांदा निवडून दिले आहे.
२००९ च्या निवडणुकीत पश्चिम नागपूरचे विभाजन होऊन दक्षिण-पश्चिम नागपूर  मतदारसंघ वेगळा झाला. पश्चिम नागपुरातून पहिल्यांदा निवडणूक लढविताना सुधाकर देशमुख यांनी निसटता विजय मिळविला होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील विकासकामांच्या अभावामुळे भाजपचा पारंपरिक गड असणा-या या मतदारसंघात त्यांच्याबद्दल यावेळी नाराजीचे वातावरण होते. कॉंग्रेसकडून माजी महापौर व या मतदारसंघात चांगला जनसंपर्क असलेले विकास ठाकरे यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार समोर असल्याने गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी देशमुखांना अधिक कष्ट घ्यावे लागणार हे चित्र सुरुवातीपासून स्पष्ट होते. सगळे प्रमुख पक्ष यावेळी वेगवेगळे लढत असल्याने येथील सामना बहुरंगी होईल असा अंदाज व्यकत केला जात होता. प्रत्यक्षात मात्र आज मतमोजणीमध्ये देशमुख यांना एकहाती विजय मिळाल्याने रंगतदार लढतीची अपेक्षा असलेल्या कित्येकांचे अंदाज चुकले तर विजयाची  आस बाळगून असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विरस झाला.
काँग्रेसचे विकास ठाकरे यांना यावेळी विजयाची उत्तम संधी होती मात्र या वेळी देखील ते भाजपच्या या परंपरागत मतदारसंघाला सुरुंग लावू शकले नाही. आघाडी साकारविरोधी वातावरणाचा फटका इतर अनेकांप्रमाणे ठाकरे यांना देखील बसला. सत्ताबदलाच्या नेमकया याच जनभावनेने देशमुख यांना या मतदारसंघात यावेळी तारले. अर्थात, मतदारसंघाच्या विभाजनानंतर भाजपचा ‘मास बेस’ निश्चितपणे वाढला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे सुमारे ६०,००० चे मताधिकय मिळाले होते. तोच कित्ता येथील मतदारांनी यावेळी देखील गिरवला.
दुस-यांदा मिळालेला विजय देशमुखांना सुखावणारा असला तरी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून मतदारांनी त्यांना काही प्रमाणात मतदान केले ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मतदानानंतर मतदारसंघात सुरू असलेली चर्चा व अगदी मतमोजणी केंद्रावर आज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात उमटलेला सूर देखील याला दुजोरा देणारा होता.  देवेंद्र फडणवीसांचा आपल्या जुन्या मतदारसंघात आजही असलेला संपर्क व या भागात पक्षाचे असलेले काम देशमुखांच्या पथ्यावर पडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा