शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा उच्च उतारा गटातील ऊस विकासाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ.सा.रे.पाटील यांनी दिली.
दत्त साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांचे एकरी ऊस उत्पादन वाढावे. तसेच ऊस क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी ऊस विकासाच्या विविध योजना अनेक वर्षांंपासून राबविल्या आहेत. यामध्ये सभासदांना खते, औषधे, जीवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रवे, हिरवळीची खते, कीटकनाशके, सुधारित जातीचे बियबियाणे, ऊस पीक स्पर्धा, ठिबक सिंचन योजना, माती परीक्षण, ऊस शेती प्रशिक्षण, परिसंवाद आदींचा समावेश आहे. या योजनांसाठी २०११-१२ या वर्षांत सुमारे २० कोटीची रक्कम कारखान्याने गुंतविली होती. कारखान्याचा ऊस विकासाचा कार्यक्रम राबविण्यासाठी व्यवस्थापनाने शेती पदवीधर व पदविका प्राप्त केलेले ८० उमेदवार नियुक्त केले आहेत.
यापूर्वी कारखान्यास राष्ट्रीय साखर महासंघ व वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट पुणे यांच्याकडून ऊस विकासाबद्दलचे पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम जपत कारखान्याने राष्ट्रीय पातळीवरील हा आणखी एक पुरस्कार प्राप्त केला आहे. याचे श्रेय शेतकरी वर्गाचे आहे. कारखान्याच्या ऊस विकास योजनेत त्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, सचिव बी.बी.शिंदे, मुख्य शेती अधिकारी एम.आर.कोरिया, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, वित्त व्यवस्थापक बी.जी.पाटील, वर्क्स मॅनेजर एम.आर.पाटील, चिफ केमिस्ट विश्वजीत शिंदे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा