सुमारे ४४ वर्षांपूर्वी स्थापन झालेला विदर्भातील पहिला वसंत सहकारी साखर कारखाना जिवंत असण्याचा दिलासा वगळता त्यानंतर उभारले गेलेले इतर सर्व १५ सहकारी  कारखाने मोडीत निघाल्याने सहकाराच्या ऱ्हासपर्वाचे एक वर्तुळ पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पैशाचा चुराडा पाहण्याची वेळ मात्र विदर्भवासीयांवर आली आहे. मध्यंतरी कारखाने दिवाळखोरीत काढून स्वस्तात विकत घेण्याचा व्यवसाय बहरला होता.
साखर कारखान्यांचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल बुडाले. साडेतीनशे कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. विदर्भातील दिवाळखोरीत निघालेले बहुतांश साखर कारखाने खासगी उद्योगसमूहांनी विकत घेतले आहेत. अत्यंत स्वस्त किमतीत विकण्यात आलेल्या या कारखान्यांपैकी किती कारखाने पुन्हा सुरू होऊ शकतील, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. २०१२-१३ च्या गळित हंगामात विदर्भातील केवळ सात कारखान्यांमध्ये उसाचे गाळप झाले. त्यात केवळ एका सहकारी साखर कारखान्याचा समावेश होता. यवतमाळ जिल्ह्य़ातील वसंत सहकारी साखर कारखाना वगळता विदर्भातील अन्य कोणत्याही साखर कारखान्यात गाळप क्षमता उरलेली नाही. काही कारखाने तर पहिल्या गाळप हंगामानंतरच बंद झाले. या कारखान्यांच्या उभारणीसाठी लागणारी मेहनत वाया तर गेलीच, शिवाय सरकारी तिजोरीलाही मोठा फटका बसला.
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील एकूण १६ सहकारी साखर कारखान्यांसाठी एकूण १२५ कोटी ७३ लाख रुपयांचे शासकीय भागभांडवल देण्यात आले होते, त्यापैकी केवळ ७० लाख रुपयांची परतफेड होऊ शकली. १२५ कोटी ३ लाख रुपये थकबाकी कायम आहे. शासकीय थकहमीवर या साखर कारखान्यांनी एकूण ३०० कोटी ८४ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. ४०० कोटींची परतफेड करायची होती, पण केवळ १८३ कोटी रुपयांची वसुली झाली. १९१ कोटींची थकबाकी शिल्लक आहे. शासकीय कर्जाची थकबाकीदेखील १६३ कोटींवर पोहोचली आहे. यात व्याजाचाही समावेश आहे. याशिवाय, शासकीय थकहमी शुल्क, साखर विकास निधीचे (एस.डी.एफ) कर्ज, अशी कोटय़वधींची देणी शिल्लक आहे. विदर्भातील महात्मा सहकारी साखर कारखाना (जि. वर्धा), राम गणेश गडकरी सहकारी (जि. नागपूर), शंकर सहकारी (जि. यवतमाळ), शेतकरी सहकारी, अंबादेवी सहकारी (जि. अमरावती), जिजामाता सहकारी (जि. बुलढाणा), अकोला जिल्हा सहकारी (जि. अकोला) हे बंद पडलेले कारखाने विकले गेले आहेत. या सात कारखान्यांच्या विक्रीतून केवळ ७५ कोटी रुपये हाती लागल्याचे सांगण्यात येते.
राजकीय पुढाऱ्यांनी सरकारी अनुदानावर डोळा ठेवून साखर कारखाने उभारण्याचा सपाटा लावला, पण विदर्भातील हवामान, ऊस उत्पादन आणि व्यवस्थापनाची क्षमता, तसेच अर्थकारण लक्षात न घेता कारखाने चालवण्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. काही अपवाद वगळता विदर्भातील साखर कारखाने कायम तोटय़ात होते. काही कारखान्यांना ऊसटंचाई भेडसावत होती. बाहेरून ऊस आणणे परवडणारे नसल्याने एक-दोन हंगामानंतर कारखाने बंद करण्याची पाळी या पुढाऱ्यांवर आली, पण नियोजनाअभावी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे स्वप्न, रोजगाराच्या संधी, मनुष्यबळ वाया गेले.
विदर्भात गाळप क्षमतेत एकमेव उरलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याने यंदा २ लाख ६६ हजार मे.टन उसाचे गाळप करून १०.८० टक्केउतारा घेऊन २ लाख ८८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले, हाच एक टिमटिमता दिवा शिल्लक उरला आहे.     (क्रमश:)