सर्व खर्च वजा जाता जो पैसा शिल्लक राहील त्यामधूनच उसाला देण्यात येणारा भाव कारखाना ठरवू शकते, असे स्पष्ट मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी ४ नोव्हेंबरला वसंत सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.तत्पूर्वी आमदार संदीप बाजोरिया व मान्यवरांच्या हस्ते उसाच्या मोळ्या घाणीत टाकून ४१व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवउखळाई संस्थानचे गुरुवर्य दत्ताबापू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन्ही उपाध्यक्ष अनिरुद्ध लोणकर व बाबासाहेब गाडे पाटील, राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, माजी नगराध्यक्ष बाबा जहागीरदार, राजूभय्या जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे, सीताराम ठाकरे, इनायतुल्ला, लालजी राऊत, माजी उपाध्यक्ष के.डी. जाधव, ख्वाजा कुरेशी, बालाजी उदावंत, बाबुराव कदम, लक्ष्मणराव जाधव व विविध संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुढे नाईक म्हणाले की, वसंतराव नाईकांच्या जुन्या पिढीतील सहकाऱ्यांनी नि:स्वार्थी भावनेतून कारखान्याचा पाया उभारला. त्यामुळे गेल्या ४१ वर्षांत अविरत वाटचाल सुरू असून विदर्भातील १६ कारखान्यांपैकी केवळ ‘वसंत’ हा एकमेव कारखाना सुरू आहे. अशीच वाटचाल यापुढेही सुरू ठेवण्यासाठी या विभागातील पुढारी, ऊस उत्पादक सभासद व कामगारांनी गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून वसंतचे वैभव कायम ठेवावे. यावेळी आमदार संदीप बाजोरिया यांनी कारखान्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा गळीत हंगाम कारखान्यासाठी ‘टर्निग पाईंट’ असून कारखाना
सहा महिने चालला तरच शेतकरी सभासदाच्या उसाला भाववाढ देणे शक्य होणार आहे, हे
कटूसत्य असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले.
विविध समस्यांतून या गळीत हंगामात शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे ऊस भाववाढ देणे शक्य होईल, या प्रयत्नातच संचालक मंडळ असून ४ लाख टनाचे गाळपाचे उद्दिष्ट उत्पादकांनी ठेवून वसंतलाच ऊस द्यावा, असे कळकळीचे आवाहन प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संचालक बळवंतराव नाईक यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा