कृष्णा साखर कारखान्याच्या सभासदांना २ रूपये किलो या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या साखरेचा मुद्दा चांगलाच राजकीय रंग आणत आहे. खऱ्या अर्थाने साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कारखान्यांना सवलतीच्या दरात साखर विकण्यास र्निबध आहेत. मात्र, सभासदांना रेशनिंगपेक्षा कमी दराने साखर मिळालीच पाहिजे व तो त्यांचा हक्कच असल्याची भूमिका अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने घेतला आहे. त्यास बहुतांश सभासदांचे समर्थन असल्याचे दिसून येत आहे. तर चुकीच्या पध्दतीने साखर वाटप करण्यात येऊ नये, कायद्याच्या चौकटीत साखर दोन रूपयांनी नव्हे, तर फुकट द्या अशी भूमिका कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी घेताना, साखरेच्या भांडवलाचे उथळ राजकारण होत असल्याची टीका केली आहे.
कृष्णा साखर कारखान्याकडे साखर आयुक्तांनी २० जुलै रोजी पाठविलेल्या एका आदेशान्वये कारखान्याने कोणत्याही परिस्थितीत नियंत्रित म्हणजेच रेशनवर मिळणाऱ्या साखरेच्या दरापेक्षा कमी दराने साखर विकू नये. तसे केल्यास संचालकांवर प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे बजावले आहे. यावर इंद्रजित मोहितेंचाच सवलतीच्या दरातील साखरेला विरोध असल्याचा निशाना विद्यमान संचालक मंडळाने साधला आहे. सवलतीच्या दोन रूपये प्रतिकिलो साखरेला इंद्रजित मोहिते यांचाच विरोध असून, त्यांनी दहा जुलै रोजी साखर आयुक्तांकडे लेखी स्वरूपात सभासदांना दोन रूपये किलो साखर देण्यात येत असल्याची पध्दत चुकीची असल्याचे तसेच त्यामुळे कारखान्याचे नुकसान होत असल्याची तक्रार दिली. आणि त्यामुळेच सभासदांच्या २ रूपये किलो साखरेला आयुक्तांकडून र्निबध आल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे संचालक मंडळाने सभासदांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने साखर मिळालीच पाहिजे व तो त्यांचा हक्कच असल्याची भूमिका घेत २ रूपये किलो साखरेसंदर्भात सकारात्मक भूमिका ठेवल्याने सभासदांचे या भूमिकेला समर्थन असल्याचे चित्र आहे. कारखान्याने जाहीर निवेदनाने आपली भूमिका मांडताना, डॉ. इंद्रजित मोहितेंच्या तक्रारीनंतरच साखर आयुक्तांनी सवलतीच्या साखरेसंदर्भात आदेश दिल्याने आता सवलतीची साखर देण्याबाबत कोणता निर्णय घ्यावा याबाबत संचालक मंडळ विचाराधिन असल्याचे स्पष्ट केले आहे. २ रूपये किलो या सवलतीच्या दरात साखर द्यावी किंवा न द्यावी, या संबंधात सभासदांनी आपले लेखी म्हणणे कारखान्यास अथवा जवळच्या शेतकी गट कार्यालयामध्ये नेऊन द्यावे असे सुचविताना, जेणेकरून यासंदर्भात निर्णय घेणे कारखान्याला सोपे होईल असे कारखान्याने जाहीर निवेदनात नमूद केले आहे.  
दरम्यान, डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात सवलतीच्या साखरेबाबतचा निर्णय मंत्री समितीने घेतलेला असून, जाणीवपूर्वक माझे नाव बदनाम केले जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. या बदनामीबद्दल कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यावर फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा डॉ. मोहिते यांनी दिला.
२ रूपये किलो सवलतीच्या साखरेचे निश्चितच अवांतर अवाजवी बुजगावणे उभे करून उथळ राजकारण केले जात असल्याची टीका त्यांनी केली. ‘कृष्णा’ च्या सभासदांना २ रूपये किलोने साखर देण्याचा निर्णय पहिल्यांदा जयवंतराव भोसले यांनी घेतला. यावर कारखान्याला ७९ अ अन्वये पहिली नोटीस १० ऑक्टोबर २००२ रोजी आली. त्यावर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी या संदर्भातील ठराव विशेष सभेत मांडून मंजूर करून घेतला. त्यानंतर आपल्या सत्तेच्या काळात अशाप्रकारच्या दोन नोटिसा अनुक्रमे १ सप्टेंबर २००५ व १४ फेब्रुवारी २००६ रोजी आल्या. याही नोटिसा वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात आल्या. या तिन्ही नोटिसांमध्ये महाराष्ट्र शासनाने ७९ अ अन्वये कारखान्याने सभासदांना सवलतीच्या दरात साखर विक्री करण्याची सध्याची पध्दत बंद करण्यात यावी. त्या ऐवजी नवीन पध्दतीने सवलतीच्या दराची साखर उपलब्ध करून द्यावी. कारखान्याने सभासदांना सवलतीने साखर विक्री करण्याचा दर हा नियंत्रित साखरेचा दर अधिक खुल्या साखरेच्या विक्रीवरील उत्पादन शुल्काच्या लागू असलेल्या दराइतका राहील, अशी माहिती इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार बैठकीत दिली.
आपण साडेतीन ते चार हजार सभासदांच्या सह्यांचे निवेदन साखर आयुक्तांकडे ३७ मुद्दे घालून दिले असून,  मात्र, त्यातील सभासदांच्या सवलतीच्या साखर दराचाच केवळ एक मुद्दा चर्चेत घेवून उर्वरित ३६ मुद्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका डॉ. मोहिते यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा