साखरेच्या भावातील चढ-उतारामुळे साखर कारखानदारी अडचणीत सापडली असताना मांजरा परिवारातील साखर कारखाने यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. साखर उद्योगातील स्थित्यंतरामुळे इतरांना साखर कदाचित गोड लागत नसली तरी देशमुखांसाठी मात्र साखरेची गोडी काही औरच आहे.
उदगीर तालुक्यातील अरिवद कांबळे यांनी १९९६मध्ये मुहूर्तमेढ रोवलेल्या प्रियदर्शनी सहकारी साखर कारखान्याची विकास सहकारी साखर कारखान्याने रीतसर खरेदी केली. प्रियदर्शनीवर इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला, त्याचे अनावरण सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. मात्र, कारखाना काही यशस्वी चालू शकला नाही. कारखाना अडचणीत आल्यानंतर ऊसउत्पादकांची कोंडी होऊ नये, या साठी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मांजरा कारखान्याने नफा-तोटय़ाचा विचार न करता दोन वष्रे हा कारखाना चालवण्यास घेतला. प्रियदर्शनीच्या अडचणी सातत्याने वाढत गेल्यामुळे शिखर बँकेने कारखाना विक्रीस काढला.
प्रियदर्शनी कारखाना चालला पाहिजे. ऊसउत्पादकांची अडचण होऊ नये, या साठी मांजरा परिवारातील विकास कारखान्याने प्रियदर्शनी खरेदीसाठी निविदा भरली. विकासच्या तुलनेत कोणीही निविदा भरू शकले नाही व सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रियदर्शनी आता विकासने रीतसर खरेदी केला आहे. प्रियदर्शनी खरेदीच्या निमित्ताने जिल्हय़ातील साखरेची गोडी पूर्णपणे देशमुखांच्या पकडीत आली आहे.
देवणी, शिरूर अनंतपाळ व निलंगा तालुक्यांतील ऊसउत्पादकांची अडचण माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आपल्या कारखान्याच्या माध्यमातून सोडवू शकले नाहीत. मात्र, आमदार दिलीपराव देशमुख यांनी जागृती शुगर हा खासगी कारखाना सुरू केला व शेतकऱ्यांची गरसोय दूर केली. प्रियदर्शनी खरेदीमुळे उदगीर, जळकोट तालुक्यांतील ऊसउत्पादकांची कायमची ददात विकासने मिटवली. अहमदपूर तालुक्यात ट्वेंटी वन शुगर हा कारखाना देशमुखांच्याच पुढाकाराने सुरू होत आहे. साखर कारखानदारीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर देशमुखांनी वर्चस्व प्रस्थापित केले. तुर्तास साखरेची गोडी देशमुखांच्या पकडीत आहे.

Story img Loader