लोणी बुद्रुक येथील भाऊसाहेब खेंडके यांच्या झोपडीला लागलेल्या आगीत जनावरांसह संसार उपयोगी साहित्य आणि दागिने जळून खाक झाले. खेंडके यांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  
भाऊसाहेब खेंडके हे उसतोडणी मजूर आहेत. राहाता पंचायत समितीचे उपसभापती सुभाष विखे यांच्या शेतीवर छप्पर बांधून राहात होते. पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली. आगीच्या दाहकतेने गायी हंबरडा फोडू लागल्याने आजूबाजूला राहात असलेल्या लोकांचे लक्ष या आगीकडे गेले. येथे जमलेल्या सर्वानीच जमेल तसे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणण्याचे शर्थीने प्रयत्न केले. परंतू आगीची भिषणता एवढी मोठी होती की, जनावरांसह खेंडके यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू अगदी अल्पावधीत जळून खाक झाल्या. आगात चार गायी व एक शेळीही भाजून मृत्युमुखी पडली.
अंगावरील कपडे वगळता या कुटूंबाचे सर्व काही आगीत खाक झाले.