ऊसभावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले असून पहिली उचल तीन हजार रूपये मिळावी या मागणीसाठी आज नेवासे तालुक्यातील नागापूर येथे संघटनेच्या वतीने रास्ता रोको करून कारखान्यावर जाणाऱ्या उसाच्या मालमोटारी अडविण्यात आल्या. उद्यापासून (मंगळवार) चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी सांगितले. 
संघटनेचे ऊसभावासाठी आंदोलन सुरूच असून नेवासे येथे संघटनेची सभा झाल्यापासून ‘आधी भाव जाहीर करा, मगच ऊस तोडा’ अशी भूमिका परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्या पाश्र्वभूमीवर दोन दिवस ऊसतोड बंद करण्याचे व वाहनांची हवा सोडण्याचे आंदोलनही झाले. संघटनेने हे आंदोलन आता तीव्र केले असून आज नागापूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस भरून चाललेल्या मालमोटारी अडविल्या. तसेच ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग यांना घेराव घालण्यात आला. यावेळी भाकपचे बाबा आरगडे, काका काळे, अध्यक्ष सारंगधर ढवाण, बाबासाहेब नवथर आदी नेते उपस्थित होते. ‘ज्ञानेश्वर’ इतरांपेक्षा नेहमीच जास्त भाव देतो, असे उत्तर देऊन अभंग यांनी सुटका करून घेतली.
दरम्यान, खडका फाटा येथे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे व उपाध्यक्ष अमृत गडाख यांनी कार्यकर्त्यांसह मुळा व ज्ञानेश्वर कारखान्यांच्या गट कार्यालयांना टाळे ठोकले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. ऊसभावासाठीच्या या आंदोलनाला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुरकुटे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. उद्यापासून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी सांगितले.

Story img Loader