पावसाळय़ाच्या अखेरच्या टप्प्यात ढगाळ वातावरण आणि हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठय़ा प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा फैलाव झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांसाठी हुकमी व चांगल्या मोबदल्याचे पीक असलेल्या उसावर या नव्या संकटाने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल असून, ऊसदर आणि अनंत अडचणींनी ग्रासलेल्या साखर उद्योगासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे.
प्राधान्याने कराड तालुक्याच्या दक्षिण भागात सध्या मोठय़ा प्रमाणात लोकरी माव्याची कीड आली असून, तिचा प्रसार झपाटय़ाने वाढतो आहे. लोकरी माव्याने उसाची पाने पांढरी तर, वाडे काळे पडले आहेत. ही कीड उसातील हरितरस शोषून घेत असल्याने उसाची वाढ खुंटत आहे. शेतीतील नवीन तंत्रज्ञान, पाण्याची अपेक्षित उपलब्धता यामुळे कराड दक्षिणच्या डोंगरी विभागात ५ ते ६ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. या उसाला लोकरी माव्याने विळखा घातला असल्याने मोठय़ा आर्थिक हानीची भीती व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्र उच्चांकी असून, प्रमुख उद्योग असलेल्या साखर निर्मिती क्षेत्रातील सर्वच कारखाने ऊसदर, लोकरी मावा, शासनाचे र्निबध आदी कारणांनी समाधानकारक आपला गळीत हंगाम घेतील का? याबाबत शंका उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने कराड तालुक्यात असून, तीन सहकारी व १ खासगी, १ खांडसरी व गुऱ्हाळघराच्या माध्यमातून उसाचे गाळप पूर्ण होते. यावर्षी तालुक्यात सुमारे २१ हजार हेक्टर ऊस क्षेत्र आहे. हा ऊस गळीत करण्यासाठी साखर कारखाने सज्ज असतानाच, उसावर लोकरी माव्याचे संकट ओढावले आहे. ढगाळ हवामानामुळे लोकरी मावा मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. त्यातच उसाची पूर्ण वाढ झाल्याने त्यावर औषध फवारणी करणेही अवघड असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रत २००३ ते २००५ या वर्षांतील ऊस लोकरी मावा प्रादुर्भावाने ग्रासला होता. त्यामुळे साखर कारखानदारीला जबर फटका बसून, सहकारी साखर उद्योग तर मेटाकुटीला आला होता. दरम्यान, यापूर्वी सलग दोन वष्रे उच्चांकी ऊस तसेच साखर उत्पादन झाले होते. यानंतर लगेच सलग दोन वर्षे उसावर लोकरी मावा पडल्याने ऊस व साखर उत्पादनात मोठी घट आली. त्यात, साखरेची टंचाई निर्माण झाली. या काळात सरकारने लोकरी मावा बाधित शेतकऱ्यांना या रोगाच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले. औषध फवारणीचे प्रात्यक्षिके देताना, औषध पुरवठाही केला. शिवाय लोकरी मावा खाणारी मित्र कीड विकसित केल्याने शेतकऱ्यांना लोकरी माव्याच्या आस्मानी संकटानंतर ऊस शेतीत सुगीचे दिवस आले आणि यानंतरच शेतकरी वर्गाने संघटित होऊन शेतकरी संघटनांच्या माध्यमातून ऊस दरवाढीसाठी आंदोलने उभारली. या आंदोलनाने आता व्यापक स्वरूप घेतले असून, बहुतांश कष्टकरी ऊस उत्पादकांनी खांद्यावर शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन साखर सम्राटांना आव्हान देण्याचे धाडस करून खंबीरपणे उभे आहेत. सहकारी साखर कारखानदारीतील भोंगळ कारभाराची चर्चाही गाव आणि वाडय़ावस्त्यांच्या पारावर होऊ लागल्याने ही एक क्रांतीच घडली असल्याचे म्हणावे लागेल. परंपरेने मिळणाऱ्या ऊस दरापेक्षा समाधानकारक भाव मिळू लागल्याने ऊस क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, शासनातर्फे चालू गळीत हंगमात गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच ढगाळ हवामानामुळे लोकरी मावा प्रादुर्भावाचे संकट आ वासून असल्याने ऊस उत्पादकांबरोबरच साखर उद्योगातही अस्वस्थता पसरत असल्याचे दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा