श्रीगोंदे तालुक्यात ऊसभावासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन आता चांगलेच चिघळू लागले आहे. त्यातूनच कुकडी कारखान्याच्या अनेक गाडय़ांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. या आंदोलनामुळे तालुक्यातील कारखानदार चांगलेच धास्तावले आहेत.
कुकडी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिकराव जगताप म्हणाले की, शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळाला पाहिजे हे मान्य आहे व तो देण्यास आम्ही तयार आहोत, मात्र फक्त आमच्याच कारखान्याच्या गाडय़ा का फोडल्या जातात, असा सवाल करीत दुष्काळात आंदोलनाचा तेरावा घातल्याने सर्व राज्यात साखर व्यवसाय अडचणीत आला आहे, अशी खंत त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
जगताप पुढे म्हणाले की, तालुक्यात सुमारे २५ ते ३० लाख मेट्रिक टन ऊस होता, मात्र बबनराव पाचपुते यांच्यामुळे तालुक्याची राखरांगोळी झाली. कुकडीच्या धरणात पाणी असताना पुण्याचे मांडलिक असणारांनी पाणी आणले नाही. परिणामी सर्व उसाचे जळून चिपाड झाले, शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्यामुळे आजमितीस तालुक्यात पाच लाख टन एवढाही ऊस नसताना कारखाने कसे चालवयाचे?
आज राज्यात उसाचे आंदोलन पेटले आहे, मात्र ज्यांच्या शेतात उसाचे टिपरूही नाही असे आंदोलनात सहभागी झाले आहेत. ज्यांनी उसासाठी आयुष्य वेचले त्या शरद पवार व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टिका करण्याचा नैतिक अधिकार तरी या आंदोलनकर्त्यांना आहे का, असा सवाल त्यांनी केला. मात्र, नेतृत्व चालावे यासाठी हे गाडय़ा अडवत आहेत, तोडफोड करत आहेत. पण मग फक्त आमच्याच गाडय़ा का फोडता? शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळाला पाहिजे त्याला आमचाही पाठिंबा आहे. मात्र, आज साखर ३२ रूपये दराने विकावी लागते. कारखाना चालवण्यासाठी येणारा खर्च पाहता एवढा भाव कसा देणार, असा सवाल करून सरकारने याबाबत लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, अन्यथा गंभीर संकट निर्माण होईल, असा इशारा जगताप यांनी यावेळी दिला.     

 आज ‘अंबालिका’वर मोर्चा
उसाच्या दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण कर्जत तालुक्यातही पोहोचले असून शेतकरी संघटना उद्या (शुक्रवारी) राशीन येथील अंबालिका या खासगी साखर कारखान्यावर (पूर्वीचा ‘जगदंबा सहकारी’) मोर्चा काढणार असल्याची माहिती संघटनेच्या दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक व शिवाजी सुद्रिक यांनी दिली.

Story img Loader