जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू झाला असला, तरी अद्याप साखर कारखान्यांनी उसाच्या पहिली उचल जाहीर केलेली नाही. उसाचा पहिला हप्ता देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गुप्त समझोता झाला असून पहिला हप्ता २ हजार रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या निर्णयात काँग्रेसचे नेते मात्र सहभागी झालेले नाहीत. यंदा अपेक्षेपेक्षा कमी दर निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन आता तीन आठवडे झाले आहेत. कायद्यानुसार गळिताला आलेल्या उसाचे पैसे १५ दिवसांच्या आत द्यावे लागतात. पण एकमत होत नसल्याने कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यात वर्ग करण्यास विलंब चालविला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे त्यांचे लक्ष लागून होते. सांगली, कोल्हापूर भागातील साखर कारखान्यांनी पहिला हप्ता २ हजार २५० ते २ हजार ३५० रुपये जाहीर केला. शेट्टी यांनी आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. यंदा शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा जोर नसल्याने कारखान्यांनी भावाच्या बाबतीत साखरेचे भाव घसरल्याचे कारण देत पहिला हप्ता कमी देण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील साखर कारखाने हे २ हजार रुपये पहिला हप्ता देणार आहेत. त्यांच्यात तसा गुप्त समझोता झाल्याची चर्चा आहे. या निर्णयापासून काही कारखाने मात्र दूर आहेत. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचा अगस्ती, आमदार चंद्रशेखर घुले यांचा ज्ञानेश्वर, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा अशोक या कारखान्यांनी २ हजार रुपये पहिला हप्ता देण्याचे ठरविले आहे. मुळा, तनपुरे या कारखान्यांचाही एवढाच भाव देण्याचा विचार चालविला आहे. कोळपेवाडी, संजीवनी, प्रवरा व संगमनेरच्या कार्यक्षेत्रात उसाची टंचाई आहे. बाहेरील ऊस मिळविताना स्पर्धा करावी लागते. २ हजार रुपये पहिला हप्ता दिला तर पुढे ऊस मिळविताना अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कारखान्यांनी गुप्त तडजोडीत भाग घेतलेला नाही.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर कारखान्याने मागील वर्षी राज्यात विक्रमी दर दिला होता. त्यामुळे यंदा संगमनेरला ऊस देण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. ते पक्व झालेला ऊसच नेत आहेत. त्यामुळे त्यांचा साखर उतारा वाढला आहे. यंदाही पहिला हप्ता जिल्ह्यात सर्वाधिक देण्याचा निर्णय संगमनेरने घेतला आहे. मागील वर्षी सर्वाधिक भाव दिल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रश्न पडला होता. आता पहिला हप्ता संगमनेर किती देतो, याकडे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे लक्ष लागले आहे. संगमनेर नंतर विखे, कोळपेवाडी व संजीवनी कारखान्याने भाव दिला. त्यांच्या भावात व संगमनेरच्या भावात फारसे अंतर नाही. त्यामुळे संगमनेरनंतर हे तीन कारखाने पहिला हप्ता अन्य कारखान्यांच्या तुलनेत ज्यादा देण्याची शक्यता आहे. या कारखान्यांनाही शेतकरी ऊस देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा