शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत सहा जलबोगदे उभारणीचा निर्णय घेतला. त्यापैकी चार जलबोगद्यांचे काम वेगाने सुरू आहे. आता अमर महाल ते ट्रॉम्बे आणि अमर महाल ते वडाळा-परळ अशा दोन जलबोगद्यांच्या उभारणीसाठी पालिकेने आता टाटा कन्सल्टिंग इंजीनिअर लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. बोगद्याची ठिकाण निश्चिती, जागेचे सर्वेक्षण इत्यादीची पाहणी करून दोन्ही जलबोगद्यांचे काम सुरू केले जाणार असून साधारण या जलबोगद्यांच्या उभारणीसाठी साडेसहा वर्षे कालावधी लागणार आहे, अशी माहिती पाणी विभागाकडून देण्यात आली. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून या परिसरात जलबोगदे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.