शेतात आलेले पीक करपून जात असतांना पाटबंधारे विभागाला मागणी करूनही, इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. अतिवृष्टी झाल्यामुळे दोनदा पेरणी करूनही रोपे वाहून गेली, खर्च व्यर्थ गेला, तिसऱ्यांदा पेरणी केलेले धानाचे पीक शेतात उभे असताना उन्हामुळे ते करपत आहेत. अशा वेळी पिकाच्या चिंतेत लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथील कवडू माडू सतीमेश्रीम (४५) यांनी आपल्या घरी सकाळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कीटकनाशक प्राशन करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील मजकूराप्रमाणे १५ दिवसांपासून सातत्याने मागणी करूनही तुडूंब भरलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी मिळत नसल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. दीड एकर शेतातील धानाचे पीक करपून गेल्यामुळे हाती काही लागणार नाही या भीतीपोटी मी आत्महत्या करीत आहे असे असून कवडू सतीमेश्राम यांनी यावर्षी पिकाकरिता बँकेतून ४०,००० रू.पीक कर्ज घेतले होते. या कर्जाच्या ओझ्यामुळे आणि पीक नष्ट होण्याच्या भीतीमुळे केलेला आत्महत्येचा प्रयत्न शेतकऱ्यावरील आलेल्या संकटांची चाहूलच वाटते.
धरणाचे पाणी न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न
शेतात आलेले पीक करपून जात असतांना पाटबंधारे विभागाला मागणी करूनही, इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही.
First published on: 20-09-2013 at 08:35 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide attempt on not given dam water supply