लग्नात मानपान केला नाही, एक तोळा सोन्याचे दागिने व हुंडय़ाची राहिलेली १५ हजाराची रक्कम मिळाली नाही, पहिली मुलगीच जन्माला आली म्हणून सासरी होणाऱ्या छळास कंटाळून वैतागून एका विवाहितेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती व सासऱ्यासह सासरच्या पाचजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आशा प्रशांत गायकवाड (वय २३) असे हुंडाबळी ठरलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील निवृत्ती चंद्रप्पा हाटकर (रा. पोलीस मुख्यालय, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी आशा हिचा विवाह प्रशांत विलास गायकवाड (रा. नागेंद्र नगर, स्वागतनगरजवळ, सोलापूर) याच्याबरोबर झाला होता. परंतु लग्नात ठरलेल्याप्रमाणे एक तोळे सोने व १५ हजारांची हुंडय़ाची राहिलेली रक्कम माहेरातून आणत नाही म्हणून पती प्रशांत व सासरा विलास यांच्यासह इतर मंडळींनी आशा हिचा जाचहाट चालविला होता. हा छळ सहन करीत सासरी नांदत असताना ती गरोदर राहिली व तिने मुलीला जन्म दिला. मुलगीच जन्माला आल्याचा राग मनात धरून सासरी तिचा पुन्हा छळ सुरू झाला. त्यामुळे अखेर तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला. याप्रकरणी पती प्रशांत गायकवाड, सासरा विलास गायकवाड, सासू राधा गायकवाड, जाऊ जया व तिचा पती अशा पाचजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोन्याचा हार लांबविला
शहरातील भवानी पेठेतील ढोर गल्लीत राहणाऱ्या पवित्राबाई रेवणसिद्ध शिंदे यांची घरफोडी होऊन चोरटय़ांनी सहा तोळे वजनाचा सोन्याचा हार लंपास केला. पोलिसांनी चोरीला गेलेल्या या सुवर्णहाराची किंमत एक लाख २ हजार इतकी दर्शविली आहे. प्रत्यक्षात बाजारपेठेत त्याची किंमत एक लाख ६२ हजार एवढी आहे. चोरटय़ांनी पवित्राबाई शिंदे यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीत प्रवेश करून ही चोरी केली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली आहे.