पनवेल तालुक्यातील सुकापूर (देवध) गावातील २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.  मितल विठ्ठल पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे.
दोन दिवसांपासून मितल याच्यामागे नवी मुंबई गुन्हे प्रकटीकरण विभागाचे हवालदार रवींद्र जाधव यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. जाधव यांच्या जाचाला कंटाळून मितलने आत्महत्येचे पाऊल उचल्याच्या आरोप मितलच्या नातेवाइकांनी केला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी मितलची आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जाधव यांचा जबाब घेण्याविषयीचे कामकाज सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. आर. थोरात यांनी लोकसत्ताला दिली. मितल हा रविवारी रात्री शिवकर येथे हळदी समारंभाला गेला होता. त्याने अतिमद्य सेवन केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर झोपण्यास सांगितले होते. रात्री पावणेबारा वाजता झोपण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मितलने आत्महत्या का केली, याविषयी तपास सुरू आहे.
पोलिसांच्या मते मितल हा व्यसनी होता, तसेच त्याचे वडील विठ्ठल पाटील यांच्याविरोधात एका महिलेने नवी मुंबई गुन्हे प्रकटीकरण विभागात तक्रार केली होती. या वेळी जाधव आणि विठ्ठल पाटील यांची ओळख झाली असवी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस हवालदार रवींद्र जाधव हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याबाबत हवालदार जाधव म्हणाले की, मी मितल पाटील याला ओळखत नाही. या प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा