पती-पत्नीच्या भांडणामध्ये मध्यस्थी करणाऱ्या आईच्या डोक्यात मुलाने कुदळ घालून निर्घृण खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना जिल्ह्य़ातील पारगाव सिरस (तालुका बीड) येथे मध्यरात्री घडली. ही घटना पाहिल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणानेही स्वत:ला जखमी करून घेतले.
पारगाव सिरस येथे महादेव गव्हाणे हे पत्नी, मुलगा व सून, नातवंडांबरोबर राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा मुलगा रामेश्वर (वय ३२) व त्याची पत्नी यांच्यात वाद होत असे. रामेश्वर मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचारही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी पती-पत्नीत पुन्हा भांडण झाले. त्यामुळे तणावात असलेल्या रामेश्वरने मध्यरात्रीनंतर एकच्या दरम्यान पत्नी व आईला मारहाण सुरू केली. त्यामुळे दोघीही घराबाहेर पळाल्या. हातात कुदळ घेऊन मुलाने आईचा पाठलाग करून डोक्यात वार केल्याने सरजुबाई महादेव गव्हाणे (वय ४७) जागीच ठार झाली. या घटनेच्या वेळी आसपासचे लोक जमा झाले. त्यांनी रामेश्वरला पकडून शांत करीत घरात नेले. सर्व लोक मृत महिलेजवळ थांबले. मात्र, याच वेळी रामेश्वरने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. सकाळी आई व मुलगा दोघांच्याही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या संतोष पंडितराव खामकर (वय २०) या हॉटेल कामगार तरुणाने मानसिक धक्क्य़ातून स्वत:च्या गळ्यावर बतईने जखमा करून घेतल्या. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Story img Loader