इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सुमन मुकुंद पोवार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यांनी विरोधी शहर विकास आघाडीच्या उमेदवार सुनीता सुरेश भुते यांचा ३८ विरुध्द १७ मतांनी पराभव केला. या विजयानंतर पोवार समर्थकांनी पालिकेत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.    
नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी पोवार व भुते यांच्यातील लढत निश्चित होती. मात्र नगराध्यक्ष निवडीच्या राजकीय हालचाली थंडावलेल्या असल्याने निवडीतील चुरस अगोदरच संपुष्टात आली होती. त्याचा प्रत्यय गुरुवारी प्रत्यक्ष मतदानावेळी आला. प्रांताधिकारी अश्विनी जिरगे या पिठासिन अधिकारी होत्या, तर त्यांच्या मदतीला मुख्याधिकारी सुनील पवार होते. मतदानाला प्रारंभ होण्यापूर्वी विरोधी सदस्य तानाजी पोवार यांनी सुमन पोवार यांच्या उमेदवारीस आक्षेप घेतला. त्या सर्वसाधारण मतदारसंघातून विजयी झाल्या असल्याने त्यांना इतर मागासवर्गीय महिला उमेदवारासाठी आरक्षित जागेची नगराध्यक्षाची निवडणूक लढविता येणार नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्याला काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष संजय कांबळे, शशांक बावचकर, रवी रजपुते यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रांत जिरगे यांनी आक्षेप घेण्यासाठी दिलेल्या संधीची वेळ संपली असल्याने त्यांचा मुद्दा फेटाळून लावला.
 त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यामध्ये पोवार यांना ३८ तर भुते यांना १७ मते मिळाली. या सभेला अटकेत असलेले नगरसेवक संजय तेलनाडे अनुपस्थित होते, तर जहाँगीर पटेकरी यांचे सदस्यत्व जिल्हाधिका-यांनी रद्द केले असल्याचे प्रांत जिरगे यांनी सांगितले. या निवडीनंतर नूतन नगराध्यक्षा सुमन पोवार यांचा सत्कार प्रांत जिरगे यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्ष संजय कांबळे, अशोक जांभळे, रवींद्र माने, रत्नप्रभा भागवत, पक्षप्रतोद सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, राहुल आवाडे, मुकुंद पोवार, लक्ष्मण पोवार, प्रमोद पोवार उपस्थित होते.