सूर्याची दाहकता वाढल्यामुळे विदर्भाच्या बहुतांश भागातील लोक उकाडय़ाने त्रस्त झाले आहेत, तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा तडाखा बसत आहे. या आठवडय़ात काही जिल्ह्य़ांत पावसाने हजेरी लावली. हेच वातावरण आणखी चार-पाच दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
फेबुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवडय़ात विदर्भातील काही जिल्ह्य़ात वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांचे आणि नागरिकांच्या घराचे नुकसान झाले होते. राज्यासह विदर्भात गेले काही दिवस उष्म्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने सकाळपासूनच उकाडा जाणवत आहे. रात्रीच्या वेळीही गारवा अनुभवायला मिळत नाही. कोकणपासून ते विदर्भापर्यंत बहुतांश भागात असेच वातावरण आहे. उन्हाचा चटका आणि दमट वातावरण सहन करणे कठीण बनले होते. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे जात आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यात काही ठिकाणी आकाश ढगांनी भरून वादळी पाऊस पडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडय़ात पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा या भागात पावसाने हजेरी लावली असताना भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धामध्ये चांगले कडाक्याचे उन्ह होते. वर्धा, चंद्रपूर आणि ब्रम्हपुरीचे तापमान ४२ अंश से. पर्यंत गेले होते. दुपारी उन्ह आणि रात्रीच्यावेळी ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढत होता. त्यातच पावसाचा शिरकाव झाला की उकाडा असहय्य होत असे. बुधवारी रात्री नागपूर शहरात आणि जिल्ह्य़ातील काही भागात चांगला पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून उकाडा वाढला आणि दुपारनंतर तापमानात वाढ झाली आहे. या बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांच्या आणि वयोवृद्धाच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून खासगी आणि सरकारी रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. गेल्यावर्षी एप्रिल व मे  महिन्यात तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे राज्यासह विदर्भातील विविध जिल्ह्य़ात पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला होता. यावेळी मात्र तशी परिस्थिती नसली तरी काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात
आहे.
तापमानात वाढ झाल्यामुळे उकाडा जाणवत आहे, शिवाय बंगालच्या उपसागरावरून बाष्प येत असल्याने आकाशात ढग जमा होत आहेत. त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह वादळी वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे काही जिल्ह्य़ात जोरदार पाऊस होत आहे. गुरुवारी विदर्भात सर्वात तापमान ब्रम्हपुरी आणि वर्धा जिल्ह्य़ात नोंदविण्यात आले आहे. अकोला ४०.३, अमरावती ३९.२, बुलढाणा ३७.५, ब्रम्हपुरी ४१, चंद्रपूर ३९.५, गोंदिया ३८.३, नागपूर
४०.३, वाशीम ३६, वर्धा ४१.२, यवतमाळ ३९ अंश तापमान नोंदविण्यात आले आहे. हवामानाची आताची स्थिती पाहता हे वातावरण आणखी चार-पाच दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे.