गेल्या आठ दिवसांपासून तापमान ४५ ते ४७.३ अंश सेल्सिअस दरम्यान राहात असल्याने अंग भाजून टाकणाऱ्या उन्हामुळे विदर्भातील सर्वसामान्य नागरिक पुरते होरपळून गेले आहे. उष्णतेच्या या लाटेचा परिणाम आता पशू-पक्ष्यांवरही दिसून येत आहे. विदर्भातील वाढते तापमान बघता उष्माघातामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे.
विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि ब्रम्हपुरी शहरात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूरच्या तापमानाने ४७.३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे, मात्र, यापूर्वी गेल्या दहा वर्षांत नागपूरचे तापमान ४७ अंशांपेक्षा अधिक नोंदवण्यात आल्याचे नागपूरच्या वेध शाळेकडून सांगण्यात आले. २००३ मध्ये ४७ अंश. से., २००९ मध्ये ४७.४ आणि २०१० मध्ये ४७.३ अंश से. २०११ मध्ये ४७.८ आणि २०१२ मध्ये ४७.२ अंश सें तापमानाची नोंद करण्यात आली होती. पुढील काही दिवस उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
दरम्यान, उष्णाची तीव्रता सकाळपासूनच जाणवत असल्याने सुट्टीचा काळ असूनही मुलांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. सकाळी ९ वाजता विदर्भातील तापमानाच्या नोंदी पाहिल्या तर याची जाणीव होते. सोमवारी दुपारी नागपूरचे तापमान ४६ अंश. से. होते. ब्रम्हपुरी ४७, चंद्रपूर ४५, गोंदिया ४७.१, वर्धा ४७.२, यवतमाळ ४३,६ अकोला ४२.५, अमरावती ४५.६ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली. पाच वाजतानंतरही वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होत नाही. वाढत्या तापमानाचा फटका फक्त नागरिकांनाच बसतो, असे नाही तर त्यामुळे पशू आणि पक्ष्यांवरही परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासोबतच त्यांचे पंख स्वच्छ करण्यासाठी आणि शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची गरज भासते, पूर्वी सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे टाके बांधलेले असायचे व त्यात पक्षी आंघोळ करीत असे. आता टाके दिसत नाही, नदी आणि नाले कोरडे पडल्याने तेथेही पक्ष्यांना पाणी मिळत नाही, त्याचा परिणाम पक्ष्यांवर होते, असे पक्षीतज्ज्ञ प्रमोद कानेटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
उन्हाळ्यात पक्ष्यांच्या खाद्यान्नाचाही प्रश्न निर्माण होतो. उन्हाळ्यात पूर्वी अंगणात धान्य वाळू घातले जायचे, स्वच्छ केले जायचे त्यातून शिल्लक राहिलेले धान्य पक्ष्यांसाठी टाकले जायचे आता ‘पॅकिंगफूड’चा काळ आल्याने पक्ष्यांना खायला धान्यच मिळत नाही. माणसांच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणामही पक्ष्यांवर झाल्याचा दावा कानेटकर यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा