‘फॉर्मल ड्रेसिंग’ म्हणजेच ऑफिससाठी लागणारा औपचारिक पेहराव हा समस्त पुरुषवर्गासाठी चिंतेचा विषय असतो. ‘रोज ऑफिसला जाताना काय घालायचे?’ हा प्रश्न पुरुषांना कायमच भेडसावत असतो. कित्येकदा उजळ रंग, लूझ फिट कपडे ऑफिसमध्ये चांगले दिसत नाहीत, त्यामुळे अशाप्रकारचे कपडे घालणेही ते टाळतात. त्यातही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मीटिंगसाठी सूट्स घालणे म्हणजे एक दिव्यच असते. कारण मुंबईचा सध्याचा उकाडा लक्षात घेता ऑफिसपर्यंत पोहचेस्तोवर घाम आणि चिकचिकाटाने वैतागून जायला होते. यावर पर्याय म्हणून सध्या बाजारात ‘समर जॅकेट्स’ येऊ लागले आहेत.
काही ठरावीक रंगाचे आणि पॅटर्नचेच कपडे ऑफिसमध्ये घातले जातात. पुरुषांच्या ऑफिसमध्ये घालायच्या औपचारिक पेहरावामध्ये विशेषत: पाश्चात्त्य देशातील पेहरावाचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. पाश्चात्त्य देशांमधील ठंड वातावरण लक्षात घेता तेथे उबदार जॅकेट्सची गरज असते, पण मुंबईमध्ये मात्र वर्षांचे बारा महिने उष्ण वातावरण असते. त्यामुळे हे सूट्स येथील वातावरणाला सोयीचे नसतात. पण केवळ ऑफिस संस्कृतीचा भाग म्हणून वूलन सूट्स, बंद गळ्याचे शर्ट्स हे कपडे घालण्याकडे पुरुषांचा कल असतो. पण याला पर्याय म्हणून डिझायनर्स आणि बॅ्रण्ड्सनी सध्या ‘समर जॅकेट्स’चा पर्याय आणला आहे. हे जॅकेट्स तयार करताना प्रामुख्याने कॉटन, लिनिंगसारखे येथील हवामानाला साजेसे कापड वापरण्याकडे त्यांनी कल दिला आहे. नेहमीच्या जॅकेट्स किंवा सूट्समध्ये फ्युजिंगमुळे अतिरिक्त वजन टाकले जाते. समर जॅकेट्समध्ये हे वजन वजा करण्यात आले आहे. नेहमीच्या शर्ट्ससोबतच हे जॅकेट्स कुर्त्यांसोबतही घालता येतात. बाजारात २,००० रुपयांपासून हे जॅकेट्स उपलब्ध आहेत.
फॉर्मल शॉर्ट्स पर्याय
ऑफिसला जाताना आखूड ट्राऊझर्स घालण्याचा विचार एरवी कोणत्याही पुरुषाच्या मानात येणार नाही. पण सध्या या परंपरेला छेद देत ‘फॉर्मल शॉर्ट्स’चे पर्याय समोर येऊ लागले आहेत. या शॉर्ट्स गुडघ्याच्या उंचीच्या असतात. सध्याचा मुंबईचा उन्हाळा आणि आगामी पावसाळा लक्षात घेता या शॉर्ट्सना तरुणांची पसंती मिळत आहे. बाजारात १,००० रुपयांपासून या शॉर्ट्स उपलब्ध आहेत.
भारतीय पुरुषांच्या पेहरावावर ब्रिटिशांचा प्रभाव
भारतीय पुरुषांच्या कार्यालयीन पेहरावावर ब्रिटिश पेहरावाचा प्रभाव अजूनही दिसतो. त्यामुळे अजूनही येथे पाश्चात्त्य पद्धतीचे सूट्स, टक्सिडोज वापरले जातात. पण भारतातील हवामान युरोपच्या तुलनेत उष्ण आहे. त्यामुळे तेथे वापरले जाणारे सूट्स भारतात वापरणे सोयीचे नाहीत. तसेच भारताकडे कापडांच्या बाबतीत विविधता पाहायला मिळते. त्यांचा वापर करून कुर्ते, खादी शर्ट्ससारख्या पारंपरिक पेहरावांचा वापरही ऑफिसच्या पेहरावात कुशलतेने करता येऊ शकतो.
व्हिटो डेलेब्रा (डिझायनर, रेमंड)