एप्रिलच्या अखेरीस उत्तर महाराष्ट्रातील तापमान ४० ते ४३ अंशावर पोहोचले असताना पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप धारण करत आहे. रणरणत्या उन्हाचा परिणाम धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढण्यात झाला असून, बहुतांश धरणातील पाणी पातळी दोन ते तीन दशलक्ष घनफूटने कमी होत आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागात वणवण सुरू असली तरी शासकीय पातळीवर मात्र त्याची धग पोहोचली नाही. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात सध्या केवळ एकच टँकर सुरू असून जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात तर जणू पाणी टंचाईच नसल्याचे चित्र प्रशासनाने रंगविले आहे. कारण, या दोन्ही ठिकाणी एकही टँकर सुरू नाही. धरणांचा जिल्हा म्हणून परिचित असणाऱ्या नाशिकमध्ये ७३ गावे व १४९ वाडय़ा पाण्यासाठी पूर्णपणे टँकरवर विसंबून आहेत.
महिनाभरापासून वर चढणाऱ्या तापमानाच्या पाऱ्याने एप्रिलच्या अखेरीस सर्वोच्च पातळी गाठली असून प्रचंड उष्म्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यात तापमानाची सर्वाधिक नोंद होणाऱ्या जळगाव जिल्ह्यात पारा ४३ अंशापर्यंत चढला तर थंड हवेकरीता प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये तापमान ४० अंशावर पोहोचले आहे. मागील वर्षी तापमानाने एप्रिलच्या अखेरीस ४० अंशांचा पारा गाठला होता. या वर्षी वेगळी स्थिती नाही. खान्देशात तर उष्णतेची लाट आली आहे. धुळे जिल्ह्यात तापमानाने ४२ तर जळगावमध्ये ४३ अंशाची पातळी गाठली आहे. मालेगाव, व नंदुरबार भागातील कमी-अधिक प्रमाणात उन्हाचा असाच तडाखा बसत आहे. उष्णतेची लाट आल्यामुळे बहुतांश नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडणे पसंत केले. परिणामी, दररोज दिवसभरातील पाच ते सहा तास सर्व प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे पहावयास मिळते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार थंडावतात. परंतु, ग्रामीण भागात लग्नसराईमुळे विपरित चित्र आहे. लग्न सोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी भर उन्हात प्रवास करण्याची तमा कोणी बाळगत नाही. सर्वत्र उत्साहात हे सोहळे टळटळीत उन्हात सुरू आहेत. जळगावकरांना प्रारंभी फारशी न जाणवलेली उन्हाची झळ एप्रिलच्या अखेरीस चांगलीच बसली. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी वाळाची तावदाने, टोप्या, पंखे, तत्सम वस्तुंच्या विक्रीत वाढ झाली आहे. तसेच आईस्क्रिम, थंड पेय, कलिंगड यांची मागणी वधारली आहे.
वाढत्या तापमानाने उत्तर महाराष्ट्रात टळटळीत उन्हाळ्याची दाहकता जाणवत आहे. त्यात ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात भारनियमन होत असल्याने जनजीवन कोलमडून पडले आहे. तुलनेत भारनियमनाचे प्रमाण शहरी भागात कमी आहे. रणरणत्या उन्हाचा परिणाम धरणांतील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढण्यात झाला आहे. बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिल्यास जेथे मुळातच जलसाठा कमी आहे, ती धरणे पूर्णत: कोरडी पडण्याची भीती व्यक्त होऊलागली आहे. यामुळे पुढील महिन्यात पाणी टंचाईचे संकट अधिक भीषण होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या अखेरीस ४० ते ४३ अंशावर चढलेला पारा मे महिन्यात कोणती उंची गाठणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
प्रशासकीय पातळीवर अनास्थेचे दर्शन
धगधगत्या वातावरणात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण महिलांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची वणवण करावी लागत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य भासत असताना प्रशासकीय पातळीवर मात्र विपरित चित्र रंगविले जात आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हा प्रशासनाची कार्यशैली, हे त्याचे उदाहरण. रणरणत्या उन्हाने तापलेल्या या भागात पाणी टंचाई नसल्याचे उपरोक्त जिल्हा प्रशासनाने अप्रत्यक्षपणे दर्शविले आहे. गाव व पाडय़ांवरून पाण्यासाठी टँकरची मागणी होत असली तरी त्याकडे कानाडोळा करण्याची भूमिका घेतली जाते. त्याचा परिपाक मेच्या प्रारंभ होईपर्यंत जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. धुळे जिल्ह्यात नावाला एक टँकर सुरू आहे. टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या एका गावाला त्यामार्फत पाणी पुरविले जाते. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक टँकर एकटय़ा नाशिक जिल्ह्यात सुरू आहेत. वास्तविक, पाण्यासाठी समृध्द मानवा जाणारा हा जिल्हा. पण, आज तो सर्वाधिक टंचाईचा सामना करत आहे. जिल्ह्यातील ७३ गावे व १४९ वाडय़ांना ७० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मनमाड शहराला २० ते २५ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. या शहराजवळ असलेल्या धोटाणे बुद्रुक येथे वितरण व्यवस्था अर्धवट असल्याने ग्रामस्थांची दैना झाली आहे. ३६ खेडी पाणी पुरवठा योजना (नागासाक्या) योजनेचे पाणी कोंढार शुध्दीकरण केंद्रातून गावातील टाकीत येते. टाकीचे काम पूर्ण झाले असून वितरण व्यवस्था अपुर्ण आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या प्रयत्नाने जलवाहिनीचे काम करण्यात आले. पण, ग्रामपंचायत जाणुनबुजून ही योजना बंद ठेवत आहे, अशी तक्रार केली जात आहे.
इगतपुरी तालुकाही तहानलेला
जाकीर शेख
निम्म्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेला इगतपुरी तालुका आज तहानलेला आहे. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहे. अनेक योजना कुचकामी ठरल्याने पाणी टंचाईचे संकट गहिरे झाले आहे. निवडणुकीचे कारण दाखवून शासकीय अधिकारी उदासिनता दाखवित असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. टाकेद परिसरातील अनेक गावांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. वैतरणा परिसरातील नदीकाठावरील अनेक गावांना टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय पेयजल, भारत निर्माण पाणी पुरवठा योजना, आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून अनेक योजना ग्रामीण भागात राबविण्यात आल्या. त्यातील अनेक योजना आजही अपुर्णावस्थेत आहे. काही योजना किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहेत. काही योजनांना पाण्याचे स्त्रोत नाहीत. दुसरीकडे बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहेत तर योजनाच कुचकामी असल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. टँकरची मागणी वाढत असली तरी शासकीय अधिकारी निवडणुकीचे कारण पुढे करतात. तलाठी व ग्रामसेवक गावांकडे फिरकत नसल्याने प्रशासनाला टंचाईचे प्रस्ताव तरी कसे सादर होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईची आढावा बैठक चार महिन्यांपूर्वी झाली होती. उपरोक्त काळात तलाठी वा ग्रामसेवकाने टंचाईचे अहवाल सादर केले नाही. टंचाईचा सामना करावा लागत असताना अजुन अनेक प्रस्ताव गेले नसल्याने ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा