थंडीने प्रदीर्घ काळ ठोकलेला मुक्काम आणि अधूनमधून झालेला बेमोसमी पाऊस, यामुळे हवामानाच्या लहरीपणाचा अनुभव घेतलेल्या उत्तर महाराष्ट्रास आता उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी सकाळपासूनच जनजीवनावर विपरित परिणाम होऊ लागल्याचे दिसत आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या तापमानाने मार्चच्या पहिल्या सप्ताहात ३४ अंशांचा टप्पा पार केल्यामुळे यंदा उन्हाळा चांगलाच टळटळीत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच, ग्रामीण भागात वीज भारनियमनही सुरू असल्याने उन्हाळ्याचा जाच अधिकच असह्य होणार आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात सर्वसाधारणपणे फेब्रुवारीपासून बदल होत असतात, असा अनुभव आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हा परिसर अनेक दिवस थंडीच्या लाटेत सापडला होता. फेब्रुवारीदरम्यान गारवा हळूहळू ओसरला आणि त्याची जागा उकाडय़ाने घेतली. गेल्या काही दिवसात नाशिकच्या तापमानात सात ते आठ अंशांनी वाढ झाली आहे. १८ फेब्रुवारीला २७ अंश सेल्सिअस असणाऱ्या तापमानाने चार मार्चपर्यंत ३४ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार भागातील वातावरण नाशिकच्या तुलनेत अधिक तापल्याचे दिसून येते. साधारणत: सकाळी ११ वाजेनंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी चटके बसत असल्याने नागरिक घराबाहेर जाण्याचे टाळतात. त्याचा परिणाम बाजारपेठ व रस्त्यांवरील वर्दळ कमी होण्यात झाल्याचे दिसत आहे. उष्म्याचा सामना करणे अवघड होत असताना भारनियमन सुरू झाल्याने समस्येत आणखी भर पडली आहे. नाशिक शहराचा अपवाद वगळता धुळे, जळगाव व नंदुरबार शहरात पाच ते सहा तास तर ग्रामीण भागात सहा ते १० तास वीज गायब राहात असल्याने जिवाची काहिली होत आहे.
उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या कुवतीनुसार तयारी करीत आहे. काही दिवसात वातानुकूलीत यंत्र, पंखे, थंडगार पाण्यासाठी माठ, खिडक्यांना पडद्याप्रमाणे बसविल्या जाणाऱ्या वाळा तत्सम साधनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. शीतपेय, आईस्क्रिम पार्लर अशा दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव हा उच्चांकी तापमानाची नोंद होणारा जिल्हा. या भागातील तापमान एव्हाना ३४.५ अंशावर जाऊन पोहोचले आहे तर भुसावळमध्ये ३५ अंशांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या जिल्ह्यात उष्म्याची लाट आली होती. त्यामुळे यंदा खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक शासकीय रुग्णालयांमध्ये खास उष्माघात कक्ष स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये दुपारी सामसूम होत असली तरी ग्रामीण भागात लग्नसराई अथवा तत्सम सोहळ्यांच्या उपस्थितीवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. वाढत्या तापमानाने पाणी टंचाईचे संकट अधिकच तीव्र होऊ लागले आहे. धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग उन्हाळ्यात वाढत असतो. परिणामी, जलसाठय़ात घट होऊन टंचाईला सामोरे जावे लागते. आधीच कमी पावसामुळे यंदा आधीपासूनच टंचाईने स्वरूप बिकट असताना वाढत्या तापमानाने त्यात भर पडणार आहे. धरणे कोरडी होत असून अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. नाशिकमध्ये दररोज १० टक्के पाणी कपात करण्यात आली असून मंगळवार हा दिवस ‘नो वॉटर डे’ म्हणून जाहीर झाला आहे. धुळे शहरात चार दिवसाआड तर जळगावमध्ये तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. नळ पाणीपुरवठय़ाचा हा कालावधी यापुढे वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा