उन्हाचा पारा ४१ डिग्रीच्या वर पोहोचल्याने या जिल्हय़ातील सिंचन प्रकल्पातील जलाशयाची पातळी झपाटय़ाने कमी होत आहे. ३१ मार्च अखेरीस सिंचन प्रकल्पात केवळ ४२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे.
कडक उन्हाळय़ाला सुरुवात झाली असून उन्हाचा पारा ४१ डिग्रीच्या वर पोहोचला आहे. एप्रिल व मे हे दोन महिने कडक उन्हाचे समजले जातात. मे महिन्यात तर उन्हाचा पारा ४५ व ४६ डिग्रीच्या वर जातो. त्यामुळे या महिन्यात सिंचन प्रकल्पातील जलसाठा झपाटय़ाने कमी होतो. एप्रिलच्या सुरुवातीलाच केवळ ४२ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. हिवाळय़ापर्यंत हा जलसाठा ५० टक्के एवढा होता. जिल्हय़ातील जलसाठय़ाच्या पातळीत मोठी घसरण होत असून ३५६ दलघमी जलसाठय़ाची क्षमता असलेल्या एकूण प्रकल्पात आजघडीला केवळ १५१ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाळय़ाच्या दिवसात नागरी वस्तीसह जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सिंचन प्रकल्पांची मोठी मदत होते. पावसाळय़ात हे प्रकल्प शेतीसाठी उपयोगी पडतात. मात्र डिसेंबरनंतर जलसाठय़ात घट होत असल्याने रब्बी उन्हाळी पिकांना फटका बसतो.
इरई धरणात सध्या १६० पैकी १०६ दलघमी म्हणजे ६६ टक्के साठा शिल्लक आहे. या धरणातून इरई नदीत पाणी विसर्जित केले जाते. या नदीवर अनेक उद्योग आणि संपूर्ण चंद्रपूर शहराची तहान भागते. उन्हाळय़ात धरण कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. सावली तालुक्यातील आसोलामेंढा तलावात ५६ पैकी १५ दलघमी म्हणजे २६ टक्के साठा आहे. जिल्हय़ात एकूण आठ मध्यम प्रकल्प असून १४० दलघमी जलसाठय़ाची क्षमता आहे. येथे ३० दलघमी म्हणजेच २२ टक्के जलसाठा आहे. सद्यास्थितीत मध्यम प्रकल्पातील घोडाझरी ४३ पैकी १२ दलघमी म्हणजे २८ टक्के साठा आहे. नलेश्वर १० पैकी १ दलघमी ९ टक्के, चारगाव येथे २० पैकी ४ दलघमी लभानसराड ७ पैकी २ दलघमी, अमलनाला २४ पैकी ५ दलघमी, पकडीगुड्डम १२ पैकी २ दलघमी तर डोंगरगांव येथे १२ पैकी ५ दलघमी जलसाठा आहे.  ११ दलघमी क्षमतेच्या चंदई प्रकल्पात डिसेंबरअखेर तीन दलघमी जलसाठा होता. जिल्ह्य़तील जलसाठय़ाची पातळी प्रत्येक महिन्यात खाली घसरत असताना दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात २२२ दलघमी एवढा जलसाठा होता. जानेवारी महिन्यात तो १९२ दलघमी एवढा झाला. फेब्रुवारी महिन्यात १७२, तर मार्च महिन्यात १५१ दलघमी एवढा कमी झाला आहे. उन्हाळय़ातील एप्रिल व मे महिन्यात परिस्थिती कठीण होईल असे सांगण्यात येत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा