उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने विदर्भाला पुढील दोन महिन्यांचा काळ कठीण राहील, असे स्पष्ट संकेत वाढत्या तापमानाने दिले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच आठ जिल्ह्य़ांमधील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेले असून चंद्रपूरकरांना उन्हाळाभर अंगाची लाही लाही करणाऱ्या तापमानात दिवस काढावे लागणार आहेत. चंद्रपुरात आज विचित्र हवामानाचा अनुभव आला. सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारी चांगलीच उन्ह तापली. यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आणि अवघ्या काही मिनिटातच मुसळधार पाऊस बरसला. वादळी पाऊस असल्याने शहरात अनेक भागात झाडे उन्मळून पडली. विजेच्या ताराही तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. पावसाचा वेग इतका होता की शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच खड्डय़ांमध्ये पाणी साचले आहे. चंद्रपूरनजीकच्या बल्लारपूर, राजुरा, जिवती व भद्रावती या परिसरातही पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्य़ातही सायंकाळी अचानक वातावरण बदलले.
विदर्भाच्या अनेक शहरांमधील तापमान चढतीवर आहे. चंद्रपुरात आज ४३.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून नागपूरला आजचा पारा ४३.२ एवढा होता. अमरावती ४२.८, वर्धा ४२.४, अकोला ४१.७, ब्रम्हपुरी ४०.९, यवतमाळ ४०.४, गोंदिया ४०.३, वाशीम ३९.९ अंश सेल्सियस अशा नोंदी आज हवामान खात्याने घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून सूर्याने डोळे वाटरल्याने दिवसा कडक उन्हाच्या झळांनी विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मानवी जीवनाबरोबरच वन्यजीवनही पोळले असून पिण्याच्या पाण्याची टंचाई आणखी भीषण रुप धारण करणार आहे.