यंदा राज्य पोलीस दलाच्या भरतीत पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत मुंबईत चार तरुणांचे बळी गेले असून नागपूरमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. भरती प्रक्रियेदरम्यान सुनील येळे हा तरुण भोवळ येऊन पडला, या तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पोलीस होण्याचे स्वप्न ‘त्याने’ पाहिले आणि त्यासाठी तयारीही जोमात सुरू होती. हिंगण्यात एसआरपीएफची ६ जूनला भरती होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आणि कुटुंबाचा भार देखील त्याच्यावर एवढय़ा सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाला. धावण्याच्या परीक्षेत एकाएकी भोवळ येऊन पडला. तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. फुफ्फुस, किडनी हे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी ४ लाख रुपयांचा खर्च असल्याचे सांगितले. हे ऐकून कुटुंबीयांचे अवसान गळाले. घरची शेती तारण ठेवून आलेल्या पैशातून ऑरेंज सिटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करणे सुरू झाले. हा तरुण सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी (ता. घाणंद) गावचा रहिवासी आहे.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची त्यात वडिलांचा आधार नाही. त्याला तीन भावंडं असून सुनील हा मधला. तो टेलरिंगचे काम करून आपली पोटापाण्याची गरज भागवितो. लग्न होऊन सहा महिने झाले. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पोलीस झाल्यावर आपले दिवस बदलतील. या आशेने त्याचे प्रयत्न सुरू होते. पोलीस भरतीमध्ये तीन ते चार वेळा सहभागी झाला. परंतु अपयश मिळाले. राज्य राखीव पोलीस दलाच्या हिंगणा तळावर भरती असल्यामुळे ५ जूनला तो सांगलीहून नागपूरला आला. रात्रभर प्रवास करून हिंगण्यात पोहचला आणि १०० मीटर धावणी, लांब उडी यात त्याने गुणवत्ता मिळविली. परंतु पाच किलोमीटरच्या धावण्याच्या परीक्षेत त्याने एक राऊंड पूर्ण केल्यावर तो अचानक भोवळ येऊन पडला. लगेच त्याला पोलिसांनी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आणि नंतर ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. धावताना त्याला रक्ताची उलटी झाली ती बाहेर न पडता श्वासनलिकेत गेली आणि तो कोमात गेला.
सुनील शुद्धीवर आला असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रोज डायलिसीस करण्यात येत असून त्याचा खर्च २५ हजार रुपये आहे. सव्वा लाख रुपयांच्या आसपास दवाखान्याचे बिल थकले आहे.

सुनीलला हवी मदत
शेती तारण ठेवून आलेले पैसे तेवढे दिले. राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्री आर.आर पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा त्याच्या कुटुंबीयांचा प्रयत्न सुरू आहे. सुनीलला बँक ऑफ इंडियाच्या १६०२१०११००००६२७ या खाते क्रमांकावर मदत पाठविण्याचे तसेच ९९२११६३२६४ व ८२७५२६६५१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या कुटुंबीयांनी केले आहे.

 

 

Story img Loader